Monday, December 5, 2011

नभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

भाग १: व्ही वाय कॅनिस मेजॉरिस

लेखमालेच्या मागच्या भागात आपण पाहिले की तार्‍याची तेजस्विता म्हणजे काय? आणि ही तेजस्विता कोणत्या २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते?

तार्‍यांची तेजस्विता पुढील २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते
१. तार्‍याचे तापमान
आणि
२. तार्‍याचे आकारमान

तर या पहिल्या भागात आकारमान या घटकाच्या अनुषंगाने ज्ञात खगोलविश्वातील आकाराने सर्वात मोठा तारा व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस याचा आढावा आपण घेऊयात.

व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची माहिती घेण्याअगोदर पुढील एक चित्र पाहूयात.
पुढील तुलनात्मक चित्रामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्याला एवढ्या लांब अंतरावरुन घामाच्या धारा आणण्याची क्षमता असलेला आपला हा सूर्य विश्वाच्या पसार्‍यातील एक नगण्य तारा आहे. असे असले तरी पृथ्वीसारख्या ग्रहावर आपणा मानवांची जी उत्क्रांती झालेली आहे त्यामुळे हाच नगण्य असलेला हा सूर्य एक अतिमहत्त्वाचा तारा होतो.
पुढील चित्रात सूर्य, अ‍ॅक्टरस (स्वाती हा तारा) आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍यांची तुलना केलेली आहे.
हे चित्र पाहताना कॄपया हे ध्यानात घ्यावे की यातील स्वाती या तार्‍याचे आकारमान शनी ग्रहाच्या भ्रमणकक्षे एवढे आहे. हे लक्षात घेतले म्हणजे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस च्या पोटात आपण कुठे असू याचा थोडाफार अंदाज बांधता येईल हास्य

या चित्रानंतर थेट सूर्य आणि व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ही तुलना पहा.

अजून एक तुलना:

सूर्य आणि व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस
संपूर्ण आकाराशी तुलना:

कॅनिस मेजॉरिस बद्दल दोन मुख्य विरोधी मते आहेत. एक विचार असा आहे की हा जास्त करुन वायुचा गोळा अधिक आहे ज्यामुळे त्याचा पृष्ठभाग प्रत्यक्षात मंगळ ग्रहाच्या कक्षेइतकाच असू शकेल.
पण सर्वमान्य सिद्धांतानुसार व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिसचे आकारमान तेवढेच आहे जेव्हढ्याचा अंदाज केला आहे.
दिलेली चित्रे वाचकांना 'अबबब' म्हणायला आणि थोडेफार मंथन करण्यासाठी पुरेशी ठरावीत wink

खुलासा: या लेखात वापरण्यात येणारी अथवा वापरली गेलेली सर्व छायाचित्रे मायाजालावरुन घेण्यात आलेली आहेत. त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत. वाचकांच्या सोयीसाठी त्यात माफक बदल मी केले आहेत.

आता व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस या अवाढव्य तार्‍याची थोडी माहिती पाहूयात.

आपल्या सूर्यापेक्षा जवळपास २,१०० पटींने मोठ्या आकाराचा असा हा लाल रंगाचा राक्षसी तारा आहे.
आपल्यापासून व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस ४,९०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजेच या तार्‍याचे जे स्वरुप आज आपण पाहतो आहे ते ४,९०० वर्षांपूर्वीचे पाहतो आहे. आत्ता चालू क्षणी तिथे काय परिस्थिती असेल हे माहिती करुन घेण्याचे कोणतेही तंत्र आपल्याकडे उपलब्ध नाही. लाल रंगाच्या राक्षसी तार्‍याची परिणती सर्वसाधारणपणे सुपरनोव्हा म्हणजे महास्फोटात होते त्यामुळे व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस हा तारा आज अस्तित्त्वात असण्याची शक्यता कमीच आहे.

व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस हा बृहल्लुब्धक म्हणून ओळखला जातो. आकाशातील याचे स्थान ओळखायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम लुब्धक (शिकार्‍याचा कुत्रा) या तारकासमूहाची माहिती करुन घ्यावी लागेल. या तारकासमूहातील हा तारा व्ही.वाय. या नावाने ओळखला जातो. या तारकासमूहात अनेक महाकाय तारे आहेत जे आपल्या सूर्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. पण त्या सर्वांत व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस आकाराने मोठा असल्याने भाव खाऊन जातो व त्यांच्याकडे दुर्लक्ष होते.

ग्रीक पुराणकथांनुसार मृग नक्षत्रातील हरणाच्या आकृतीच्या मागावर असलेल्या व्याधाच्या दोन कुत्र्यांपैकी मोठा कुत्रा हा बृहल्लुब्धक (कॅनिस मेजॉरिस) मानला जातो. राजन्य (इंग्रजी नाव रिगेल) हा मृग नक्षत्रातला सर्वांत तेजस्वी, तसेच रात्रीच्या आकाशातला सहावा तेजस्वी तारा आहे. त्याची दृश्यप्रत ०.१८ आहे. दृश्यप्रत म्हणजे तार्‍याची तेजस्विता. दृश्यप्रत कशी मोजतात? तर एखाद्या तार्‍याची तेजस्विता म्हणजेच त्याचा प्रखरपणा किंवा अंधुकपणा याची माहिती करुन घेण्यासाठी त्याला दृश्य प्रत दिली जाते. सर्वसाधारण दृश्य प्रत १ मानून त्यानुसार इतर तार्‍यांच्या तेजस्वितेची दॄश्यप्रत ठरवतात. म्हणजे ज्या तार्‍याचा प्रखरपणा १ पेक्षा जास्त असेल त्याला ऋण संख्येत मोजले जाते. सर्वसाधारण डोळ्यांना जास्तीत जास्त ६ दृश्यप्रत असलेले तारे पाहता येतात. ज्या तार्‍याची ऋण दॄश्य प्रत जेवढी जास्त तेवढा तो तारा जास्त प्रकाशमान आहे असे म्हणतात. ७ व त्यापेक्षा जास्त दॄश्यप्रतीचे तारे पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागते.

पुढील नकाशावरुन आकाशात मृगनक्षत्र शोधता येईल. मृग नक्षत्रातील व्याधाचा तारा म्हणजे नभोमंडलाचे भूषणच आहे. यासारखा दुसरा तेजस्वी तारा आकाशात दिसत नाही. त्यामुळे व्याधाच्या तार्‍याजवळच व्ही.वाय.कॅनिस मेजॉरिस शोधता येईल. आकाशातील अतितेजस्वी तार्‍याच्या शेजारीच आकाराने सर्वात मोठा असलेला तारा असा विरोधाभास आपल्याला बघायला मिळतो हे आपले एक भाग्यच म्हटले पाहिजे.

व्याधाच्या (सिरस) तार्‍याभोवती मी गुलाबी रंगाने २ गोल केले आहेत , त्यावरुन कॅनिस मेजॉरिस शोधायला अडचण पडू नये. मृग नक्षत्र जवळपास सर्वांनाच माहिती असते, तरीसुद्धा दिलेल्या नकाशाच्या आकारावरुन व पुढील चित्रावरुन आकाशात हे मृगनक्षत्र ओळखता यावे.

बृहल्लुब्धकाचा हा भाग किती महत्त्वाच्या तार्‍यांनी भरलेला आहे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट होईल.

तर

हबल टेलिस्कोप ने टिपलेले या महाकाय तार्‍याचे विहंगम दॄष्य

आणि सर्वात शेवटी व्ही.वाय. कॅनिस मेजॉरिस या तार्‍याची आपल्या ग्रहमालेतील महाकाय वाटणार्‍या ग्रहांशी तुलना किती अर्थहीन आहे हे दाखवणारे हे चित्र


Saturday, November 12, 2011

खगोलविश्व : पश्चिम क्षितिजावर शुक्र आणि बुध या ग्रहांचे विहंगम दृश्य

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,



आकाशातले ग्रह तारे नेहमीच आपल्याला मोहीनी घालत आले आहेत. सध्या असेच एक सुंदर दृश्य पश्चिम क्षितिजाची शोभा वाढवत आहे. नुसत्या डोळ्यांनी पूर्व क्षितिजावर "शुक्र" आणि "बुध" हे ग्रह अगदी एकमेकांच्या शेजारी दिसत आहेत. प्रत्यक्षात एकमेकांपासून कित्येक कोटी किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन ग्रहांची ही युती आभासी असली तरी आपल्या पृथ्वीवासियांसाठी एक विहंगम खगोलीय घटना आहे. तेव्हा पश्चिम क्षितिजावर संध्याकाळी दिसणारे दॄष्य कसे होते ते कालच्या या सूर्यास्तानंतर लगेचच घेतलेल्या छायाचित्रात पहा आणि पुढचे कित्येक दिवस तुम्ही प्रत्यक्ष पाहून या खगोलीय घटनेचा आस्वाद घ्या. शक्यतो बुध आणि शुक्र हे २ ग्रह एवढ्या जवळ दिसत नाहीत. पण सध्या यांची युती अगदी रंगात आली आहे

गुरु सध्या चंद्राच्या जवळ आहे. पण नेहमी ही स्थिती रहात नाही याचे कारण चंद्र आपल्या पृथ्वीभोवती भ्रमण करायला २७.३ दिवस घेतो, त्यामुळे दर दिवशी तो उगवतो ती वेळ वेगळी असते.

शुक्राचे तेज गुरुच्या तुलनेत जास्त असते म्हणून वरील चित्रात तो सर्वात ठळक दिसतोय. तेजस्वितेच्या बाबतीत गुरु महाराजांचा क्रमांक शुक्र महोदयानंतर लागतो wink

चित्रात गुरु नाहिये
तो असा दुसर्‍या बाजूला होता...


सध्या आकाशात अनेक विहंगम दृश्ये बघावयास मिळत आहेत. येत्या १५ - १९ नोव्हेंबर दरम्यान रात्री आकाशात उल्कांचा वर्षाव दिसणार आहे.

पण हे झाले कधीतरी घडणार्‍या खगोलीय घटनांबाबत. चित्रा आणि स्वाती या जेव्हा आकाशात प्रवेश करतात तेव्हा अर्ध्या आकाशाचे वैभव हिरावून दिमाखदारपणे चमकत असतात.

सप्तर्षी तारका समूहातील पहिल्या दोन तारकांना जोडून एक रेषा सरळ काढली की आपल्याला ध्रुव तारा दिसतो. तद्वतच चित्रा आणि स्वातीचा शोध घेण्यासाठी सप्तर्षी च्या शेवटच्या दोन तारकांचा आधार घ्यावा लागतो. खरे तर या तारकांचे तेजच त्यांची ओळख आहे. पण नवख्या माणसाला ह्याच चित्रा आणि स्वाती आहेत याची खात्री पटवण्यासाठी सप्तर्षीचे शेपूट उपयोगी पडते.
चित्रा आणि स्वाती अशा दिसतात. त्यांना कसे ओळखायचे ते पुढील नकाशावरुन स्पष्ट व्हावे.

From

चित्राचे इंग्रजी नाव आहे स्पायका आणि स्वातीचे आहे आर्क्टरस

चित्रा ही सूर्यापुढे थोडी लाजते. एक नीलवर्णी बटू तारा आहे हा.

स्वाती मात्र त्याबाबतीत एकदम बिनधास्त आहे. स्वाती हा तारा दिसतो खूप मनोरम. पण आपल्या सूर्यमहाराजांचे हिच्यापुढे काहीच चालत नाही. भास्कर महाराजांची नजर कायम झुकलेलीच असती या स्वातीपुढे. आपल्या सूर्याच्या तुलनेत ही स्वाती त्याला अगदी कडेवर घेऊन फिरेल अशी महाकाय आहे. केव्हढी ते पुढील चित्रावरुन स्पष्ट व्हावे.


सूर्यमालेतील शनि ग्रहाची कक्षा जेवढी आहे तेवढा या स्वातीचा आकार आहे. एक राक्षसी तारा असल्यामुळे स्वातीचा आकार दिवसेंदिवस फुगत चालला आहे.

सध्या या चित्रा आणि स्वातीचे सौंदर्य पश्चिम आकाशात रात्री केव्हाही पाहता येईल. साडे-आठ साडे- नऊ ही योग्य वेळ ठरावी.



या लेखातील व माझ्या प्रतिसादांत वापरण्यात आलेली छायाचित्रे वा रेखाचित्रे मायाजालावरुन घेतलेली आहेत. आवश्यकतेनुसार मी थोडे फार बदल केले आहेत. या सर्व चित्रांचे हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत.

Wednesday, September 14, 2011

पिन-व्हील आकाशगंगेत झालाय सुपरनोव्हाचा विस्फोट

एम-१०१ उर्फ पिन-व्हील या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर्पिलाकार आकाशगंगेत गेल्या महिन्यात म्हणजे २३ ऑगस्ट २०११ या दिवशी एक खूप मोठा सुपरनोव्हाचा विस्फोट झाल्याचा शोध लागला.
हीच ती पिन-व्हील आकाशगंगा :
From Khagol

आज संध्याकाळपासून म्हणजे १४ सप्टेंबर २०११ पासून या सुपरनोव्हाची चमक ही सर्वात जास्त राहीन. किमान पुढील एक महिना तरी हे विहंगम दृष्य आकाशात एका छोट्याश्या दुर्बिणीच्या साहाय्याने पाहता येईल.


ध्रुव तार्‍याकडे दिशानिर्देश करणार्‍या सप्तर्षि तारकासमूहाच्या शेवटच्या तीन तार्‍यांच्या खालच्या बाजूला या सुपरनोव्हाचे दर्शन घडेल.
पुढील २ नकाशांवरुन सुपरनोव्हाचे ठिकाण आकाशात सहज शोधता येईल.
नकाशा क्र. १:
From Khagol

नकाशा क्र. २
From Khagol


आणि या नकाशावरुन पिन-व्हील आकाशगंगेतील सुपरनोव्हाची नक्की जागा कळू शकेल.

या अत्भुत खगोलीय घटनेची अजून माहिती घेण्याअगोदर आपण "सुपरनोव्हा म्हणजे काय? " हे थोडक्यात पाहूयात.
सुपरनोव्हाची गळाभेट घेण्या अगोदर आधी 'नोव्हा'च्या दारात थोडी पायधूळ झाडूयात.
नोव्हा बहुतांशी दोन तार्‍यांच्या धुमश्चक्रीतून निर्माण होतो. जेव्हा एखादा श्वेत बटू तारा (ज्याची घनता जास्त असते) त्याच्या जवळ असणार्‍या (आयुष्य संपत आलेल्या) राक्षसी तार्‍यातील द्रव्य (हेलियम वायू) मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचून घेतो त्यावेळी हेलियम आणि हायड्रोजन या दोन वायुंच्या संयोगामुळे प्रचंड मोठे स्फोट होतात, या विस्फोटांमुळे तार्‍याची तेजस्विता कितेक पटींने वाढते व हे स्फोट दुर्बिणीतून आपल्याला दिसतात. अर्थात यांचे प्रमाण मर्यादीत असते म्हणून या स्फोटाला नोव्हा म्हणतात

आता सुपरनोव्हाकडे वळूयात.
आकाशातील एखाद्या विशाल ताऱ्याचा स्फोट होतो आणि तो प्रज्वलित होऊन आकाशात बराच काळ दिसतो , ताऱ्यांच्या या स्थितीला सुपरनोव्हा असे म्हणतात .
आपल्या मिल्की वे या आकाशगंगेतील केपलर सुपरनोव्हाचा स्फोट सुप्रसिद्ध आहे. पुढील छायाचित्रावरुन या केपलर सुपरनोव्हाच्या सौंदर्याची भुरळ पडू लागली तरी हे विहंगम दिसत असलेले दृश्य एका महाविस्फोटाचे आहे हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
आता आजपासून एक महिनाभर अवकाशात दिसणार्‍या या अत्भुत खगोलीय घटनेची माहिती घेऊयात.
पिन-व्हील (एम-१०१) या आकाशगंगेत झालेल्या या विस्फोटाची पहिली माहिती २३ ऑगस्ट २०११ लाच मिळाली होती. हळू हळू या सुपरनोव्हाची चमक वाढते आहे आणि आज रात्री किंवा उद्या (गुरुवारी) रात्री याची चमक उच्चतम असेल. साधारण महिनाभर आकाशात हे रोमांचक दृश्य पहावयास मिळेल. त्यानंतर मात्र ही चमक हळू हळू कमी होईल. वैज्ञानिकांना या सुपरनोव्हाच्या स्फोटाचे अगदी सुरुवातीचे काही क्षण पहावयास मिळाले आहेत, आणि ही अतिशय दुर्मिळ स्थिती असते. बर्‍याच वेळा स्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी या घटनांचा शोध लागतो. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात जवळ असलेला आणि सर्वात चमकदार असा सुपरनोव्हाचा विस्फोट आहे. या सुपरनोव्हाचे नामकरण "एस.एन.२०११-एफ.ई." असे ठेवण्यात आले आहे. आपल्यापासून साधारणपणे २.१ कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या या सर्पिलाकार आकाशगंगेचे अंतर इतर आकाशगंगांच्या तुलनेने जवळ आहे.

आतापर्यंत संपूर्ण मानवजातीच्या ज्ञात इतिहासात केवळ ४ सुपरनोव्हाचे स्फोट झाल्याची माहिती आहे, यावरुन ह्या खगोलीय घटनेचे महत्त्व लक्षात यावे. हे सर्व चारही स्फोट आपल्याच आकाशगंगेत झालेले होते.
पहिला स्फोट १००६ साली,
दुसरा १०५४ साली,
तिसरा १५७२ साली आणि
चौथा १६०४ साली
असे सर्वात चमकदार चार सुपरनोव्हाचे स्फोट ज्ञात आहेत.

कोणत्याही प्लॅनेटोरियममध्ये जाऊन हे सुंदर दृश्य तुम्हाला बघता येईल. पुढील महिनाभरच दिसणारे हे सुंदर दृश्य कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्यात बघावयास मिळण्याची शक्यताही नाहीये. तेव्हा ही संधी चुकवू नका आणि या अत्भुत खगोलीय घटनेचा - सुपरनोव्हाचा स्फोट - अवश्य पहा.

Wednesday, July 20, 2011

हजारो वर्षे न विसरला जाणारा दिवस


आजचा दिवस पुढची हजारो वर्षे मानव अस्तित्त्वात असेपर्यंत विसरला जाणार नाही
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँगने अपोलो-११ या यानातून खाली चंद्रावर पाय ठेवला आणि त्याच क्षणी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्याचा इतिहास निर्माण झाला.
इतिहासात हा दिवस सुर्वणाक्षरांनी कोरला गेला आहे.
यापुढे मानव कदाचित मंगळावर जाईल , दुसर्‍या सूर्यमालेतील ग्रहांवर देखील जाईल
पण पृथ्वीबाहेर प्रथमच दुसर्‍या जमीनीवर पाय ठेवण्याच्या आजच्या या दिवसाची बरोबरी कधीच होऊ शकणार नाही.
मानवाच्या या अत्भुत पराक्रमाचे आजच्या दिनी स्मरण करुयात आणि आपल्या सर्वांच्याच हृदयात ही घटना कायमची कोरून ठेवूयातहास्य
मानवाचे चंद्रावरचे पहिले पाऊल :
File:Apollo 11 bootprint.jpg
नील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरताना टिपलेले छायाचित्र
File:Apollo 11 first step.jpg
अपोलो-११ यानाचा लोगो
चित्र:Apollo 11 insignia.png
नील आर्मस्ट्राँग
अवांतर : भारतीय पुराणकथांप्रमाणे चंद्रावर जाणार्‍या पहिल्या मानवाचे नाव बाहुबली होते. (आर्मस्ट्राँगचा भारतीय अनुवाद केल्यावर यातील रहस्य हादरवून टाकते) wink

एक मतप्रवाह असा आहे की अमेरिकन्स नी चंद्रावर जाण्यात यश मिळवलेच नव्हते आणि जे व्हिडिओ फूटेज जाहीर केले होते त्याचे शूटिंग त्यांनी पृथ्वीवरच केले होते.
पण यात काही तथ्यांश आहे असे मला वाटत नाही.
अवकाशयुगाची नांदी सुरु झाली ती रशियाने स्पुटनिक हा पहिला उपग्रह अंतराळात सोडला त्यामुळे
त्यानंतरही कित्येक वर्षे अंतराळावर रशियाचेच वर्चस्व होते
पहिला पुरुष अंतराळवीर आणि पहिली महिला अंतराळवीर रशियाचेच होते
युरी गागारीन आणि व्हेलेन्तिना तेरेश्कोव्हा
एवढेच काय पण अंतराळातील पहिला प्राणी पण रशियानेच पाठवला होता
लायका नावाची कुत्री अंतराळात पाठवून तिला सुखरुपपणे पृथ्वीवर परत आणण्याचा प्रयोग रशियाने यशस्वी केला, मगच युरी गागारीनची अंतराळ वारी झाली.
रशियाच्या या अशा कमालीच्या वर्चस्वाखाली अंतराळयुग जाते आहे हे अमेरिकेला बघवणे शक्य नव्हते.
जगाची आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने अस्तित्त्वात उतरवू पाहणार्‍या अमेरिकेने रशियाला शह देण्यासाठी थेट चंद्रावरच माणसाचे पाऊल ठेवून दाखवण्याचा चंग बांधला.
दोन देशांतील कमालीच्या स्पर्धेमुळेच मानवाचे पाऊल चंद्रावर उमटले असे म्हटले तर यात अतिशयोक्ती होणार नाही. अतिशय सखोल अभ्यास करुन व कित्येक अपोलो यानाच्या वार्‍या चंद्रावर करुन अमेरिकेने याची सिद्धता केली होती. अपोलो मालिकेतल्या ११व्या यानातून मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले यावरुन अमेरिकेने किती तयारी केली होती हे स्पष्ट व्हावे. यात अपोलो याने चंद्रावर आदळली देखील आहेत, त्यातूनच अंतराळयानाचे सेफ लॅन्डींग कसे करावे याचे तंत्र विकसित झाले.
रशियातील अंतर्गत घडामोडींमुळे अंतराळयुगात रशियाची असणारी सद्दी हळूहळू संपू लागली.
रशियात उसळलेल्या पेरेस्त्रोईका आणि ग्लास्तनोस्त या लाटेचे आणि गोर्बाचेव्ह यांच्या प्रभावाचे पर्यवसान पुढे रशियाचे विभाजन होण्यात झाले.
आणि अंतराळयुगात अमेरिकेचा एकाधिकार प्रस्थापित झाला.
अशी ही कथा आहे.
तरी अमेरिकेने चंद्रावर सर्वप्रथम मानव पाठवला हे जगन्मान्य सत्य आहे.
जोपर्यंत नासा या अमेरिकन स्पेस एजन्सीने चंद्रावर पहिला माणूस पाठवला याचे पुराव्यांनिशी खंडन होत नाही तोपर्यंत तरी नील आर्मस्ट्राँग हाच चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा मानव होता हे सत्य त्रिकालाबाधित राहिल हास्य
अशा कित्येक इमेल्स पण आहेत ज्यात नासा चे चंद्रावरचे पहिले पाऊल हे अभियान खोटे कसे आहे याचे पुरावे देण्यात आलेले आहेत.
पण या पुराव्यांत काही दम नाहिये. अवकाशात प्रकाशाचे नियम पृथ्वीप्रमाणे काम करत नाहीत. कारण पृथ्वीवर दाट वातावरण आहे आणि वातावरणामुळे प्रकाशाच्या निराळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. अवकाशात सगळे काळेच असते.
पण अशा ईमेल्स आणि हे दुवे सनसनाटी बातमी म्हणून खपू शकतात.
यात काही तथ्य असते तर जगभरातील एकाही शास्त्रज्ञाने याचा पाठपुरावा करु नये असे कसे होईल?
पण अशा अफवांच्या गर्दीत सत्य सूर्यप्रकाशासाखे लख्ख चमकते तद्वतच चंद्रावर उतरणारा पहिला मानव नील आर्मस्ट्राँगच आहे हास्य
दिलेल्या दुव्यांमुळे येथील कित्येक वाचकांना हा मुद्दा समजण्यास खूप मोठी मदत होईल.
धन्यवाद,
~सागर
(या लेखातील छायाचित्रे मायाजालावरुन घेतलेली आहेत. व त्या छायाचित्रांचे सर्व हक्क त्या त्या संस्थांकडे सुरक्षित आहेत. )

Monday, June 13, 2011

गेल्या १०० वर्षांतील १०० मिनिटे दिसणारे एकमेव खग्रास चंद्रग्रहण



बुधवार दिनांक १५ जून २०११ रोजी एक अभूतपूर्व खगोलिय घटनेचे आपण सर्व साक्षीदार असणार आहोत.
गेल्या १०० वर्षांतील १०० मिनिटे दिसणारे एकमेव खग्रास (पूर्ण) चंद्रग्रहण आपणास पहावयास मिळणार आहे.
बुधवारी रात्री होणार्‍या पूर्ण चंद्रग्रहणाच्या काळात, जवळपास पावणे दोन तास चंद्र आपली सतेज शुभ्र रंगाची आभा गमावणार आहे. आणि या काळात पृथ्वीच्या छायेत आल्यामुळे चंद्रमा आपल्याला लालसर रंगाने ग्रस्त झालेला पहावयास मिळेल. या चंद्रग्रहणाचा संपूर्ण कालावधी आहे ५ तास आणि ३६ मिनिटे. पण चंद्रमा पूर्ण झाकला गेला आहे अशी स्थिती मात्र १ तास ४० मिनिटांसाठी राहीन. अर्थात दीड तासापेक्षा जास्त वेळ पूर्ण चंद्रग्रहण पहावयास मिळणेच दुर्मिळ आहे.
हे चंद्रग्रहण बुधवारी रात्री १० वाजून ५४ मिनिटांनी सुरु होईन आणि गुरुवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी संपेल. हे ग्रहण बंगळुरासहीत संपूर्ण भारतात दिसेन. उत्तर भारतात जैसलमेर, जयपुर या राजस्थानच्या भागांप्रमाणेच जिथे मान्सून पोहोचला नाहिये त्या त्या ठिकाणांहून हे पूर्ण चंद्रग्रहण ढगांचा अभाव असल्यामुळे अगदी सुंदर दिसेन व स्पष्टपणेदेखील पाहता येईल.
या चंद्रग्रहणाची स्थिती पुढील प्रमाणे राहीन.
मी बंगळूरात असल्यामुळे पुढील वेळा बंगळूरातील आहेत. पण थोड्याफार फरकाने सर्वत्र याच वेळेच्या आसपास हे पूर्ण चंद्रग्रहण पहावयास मिळेल.
१. चंद्राचा पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश - १५-जून-२०११, बुधवारी - रात्री १० वाजून ५४ मिनिटे
२. चंद्राचा पृथ्वीच्या मुख्य छायेत प्रवेश - १५-जून-२०११, बुधवारी - रात्री ११ वाजून ५२ मिनिटांनी
३. पूर्ण चंद्रग्रहण स्थिती आरंभ - १६-जून-२०११, गुरुवारी - रात्री १२ वाजून ५२ मिनिटांनी
४. पूर्ण चंद्रग्रहण स्थिती शेवट - १६-जून-२०११, गुरुवारी - रात्री २ वाजून ३२ मिनिटांनी
५. पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी - १ तास ४० मिनिटे (या संपूर्ण ग्रहण काळात चंद्र निस्तेज पण लालसर आभेनी ग्रस्त असा दिसेन.
६. चंद्राची पृथ्वीच्या मुख्य छायेतून सुटका - १६ -जून-२०११, गुरुवारी - पहाटे ३ वाजून ५२ मिनिटांनी
७. चंद्राची पृथ्वीच्या उपछायेतून सुटका अर्थात ग्रहणसमाप्ती - १६-जून-२०११, गुरुवारी - पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी
एवढ्या दीर्घ काळासाठी असल्यामुळेच हे पूर्ण चंद्रग्रहण एकदम खास आहे.
हे ग्रहण भारताबरोबरच ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, सिंगापुर, थायलंड, फिलंपाईन्स , चीन, मंगोलिया, जापान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण , इराक या ठिकाणि दिसेन.
युरोप मध्ये या ग्रहणाची सुरुवात पहावयास नाही मिळणार कारण तिकडे चंद्रोदय झालेला नसेन. तरी तिकडून पूर्ण चंद्रग्रहण स्थिती मात्र नक्की बघावयास मिळेन.
१०० मिनिटांपेक्षा जास्त वेळ दिसणारे पूर्ण चंद्रग्रहण हे खूप दुर्मिळ असते. मागच्या १०० वर्षांत फक्त तीनच वेळा १०० मिनिटांपेक्षा जास्त वेळ दिसणारे पूर्ण चंद्रग्रहण झाले आहे.
पहिले - १६ जुलै १९३५ रोजी - १०१ मिनिटे दिसलेले
दुसरे - ६ जुलै १९८२ रोजी - १०७ मिनिटे दिसलेले
आणि
तिसरे - १६ जुलै २००० रोजी - १०७ मिनिटे दिसलेले .
यावरुन १ तास ४० मिनिटे दिसणार्‍या खग्रास चंद्रग्रहणाचे महत्त्व लक्षात यावे . हास्य
यापुढचे १०० मिनिटांपेक्षा जास्त दिसणारे पूर्ण चंद्रग्रहण २७ जुलै २०१८ रोजी पहावयास मिळेल. आणि हे ग्रहण १०६ मिनिटांचे असेन.
अर्थात यापुढील पूर्ण चंद्रग्रहण याच वर्षी १० डिसेंबरला बघावयास मिळेन. पण ही पूर्ण ग्रहणस्थिती फक्त २५ मिनिटे बघावयास मिळेन.
यावेळच्या चंद्रग्रहणात पृथ्वीच्या वातावरणानुसार चंद्रमा धूसर किंवा दाट किंवा फिकट लाल रंगाचा दिसू शकतो. पण पूर्ण चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र पूर्णपणे अदृष्य होणार नाही .
खगोलशास्त्रीय घटनांकडे नव्याने वळणार्‍या वाचकांना पृथ्वीची मुख्य छाया व उपछाया म्हणजे काय ? हा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. त्याचे थोडक्यात उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
चंद्रग्रहण होण्याचे कारण म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वीचे येणे हे प्रमुख कारण असते हे तर आता सर्वांनाच माहिती आहे.
तर जेव्हा पृथ्वीची सावली पडते तेव्हा ती दोन प्रकारची असते.
एक विरळ सावली आणि दुसरी असते ती दाट सावली.
सूर्याच्या एका टोकाकडून निघणारे प्रकाशकिरण पृथ्वीच्या दोन्ही टोकांना छेदून पुढे जातात तसेच सूर्याच्या दुसर्‍या टोकाकडून निघणारे प्रकाशकिरणही पृथ्वीला दोन कोनांतून छेदून पुढे जातात. यामुळे पृथ्वीच्या २ सावल्या पडतात. एक बाह्य सावली विरळ असते आणि दुसरी दाट सावली असते.
पुढील रेखाचित्रावरुन हे स्पष्ट व्हावे.
From Khagol
पृथ्वीची दाट छाया आणि उपछाया यावर लोकसत्तातील हा लेख अधिक माहिती देऊ शकेन
हे चित्र चंद्रग्रहणाची स्थिती जास्त स्पष्ट करेन

या लेखातील दुसरे चित्र मायाजालावरुन घेतले आहे व त्याचे सर्वाधिकार त्या विवक्षित संस्थेकडे सुरक्षित आहेत

Tuesday, April 26, 2011

१ मे २००११, रविवार या दिवशी आकाशात ग्रहांची पार्टी


येत्या १ मे २००११, रविवार या दिवशी  आकाशात ग्रहांची पार्टी होणार आहे.

नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे आणि दुर्बिणीतून दिसू शकणारे असे दोन्ही प्रकारचे सर्व ग्रह सलगतेने एका छोट्या कालावधीत चंद्राबरोबर पाहता येतील. फक्त शनि हा विरुद्ध बाजूला असल्यामुळे सर्व ग्रहांच्या बरोबर नसेन.

ही एक अत्भुत आणि अद्वितीय अशी खगोलीय घटना आहे. सर्व ग्रह एकत्र येण्यासाठी खूप मोठा असा कित्येक वर्षांचा कालावधी जावा लागतो. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मधे असलेले ग्रह आणि पृथ्वीच्या पलिकडच्या कक्षेत असलेला मंगळ हा ग्रह देखील सूर्याभोवती वेगात फेर्‍या मारतात त्यामुळे हे ग्रह लवकर एकत्र  येतात.
पण तुलनेने जास्त लांब असलेले ग्रह गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे सर्व ग्रह एक सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक वर्षे घेतात. हे लक्षात घेतले म्हणजे  ही खगोलीय घटना किती दुर्मिळ आहे हे लक्षात येईल.

आता आकाशात कोणकोणते ग्रह १ मे २०११ या दिवशी दिसणार आहेत आणि कोणत्या वेळी ते पाहूयात.
या दिवशी सूर्योदयाच्या थोडे आधी पहाटे आकाश काळे असताना हा सुंदर देखावा दिसण्यास सुरुवात होईन.  जवळपास एका रेषेत असलेले हे सर्व ग्रह शोधायला फारसे कष्ट पडणार नाहीत.

ख-मध्यापासून (म्हणजे आकाशाच्या मध्यापासून)  ते पूर्व क्षितिजाकडे एक नजर टाकली की त्या दिशेत चंद्र आणि एकूण ८ ग्रह एका-मागोमाग असे दृष्टीस पडतील. यांच्यातही गुरु आणि मंगळ एकत्र जोडीच्या स्वरुपात दिसतील तर दुसरी जोडी नजरेस पडेल ती बुध आणि शुक्र या ग्रहांची.

ही माहिती झाली नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या ग्रहांबद्दल. आता  द्विनेत्री (बायनॉक्युलर) च्या  साहाय्याने पाहता येणार्‍या ग्रहांबद्दल पाहूयात. एखादी छोटी दुर्बिण असेन तर फार उत्तम. प्लुटो , नेपच्युन आणि युरेनस हे ग्रह सर्वप्रथम उगवतील व आकाशाच्या मध्यापासून ते दिसू शकतील.

१ मे ला सहस्त्ररश्मि सूर्य आगमन करायच्या आधी काही तासांपासूनच हे सर्व ग्रह एकामागोमाग एक उगवायला सुरुवात करतील.
कसे ते क्रमाने पाहूयात.

- प्लुटो ३० एप्रिल च्या रात्रीच १० वाजून ५६ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवेल.
- त्यानंतर १ मे च्या भल्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी नेपच्युन उगवेल
- मग युरेनसचे आगमन होईल ते ३ वाजून ५३ मिनिटांनी
- एरव्ही आकाशातील राजा असलेला पण अमावस्येच्या छायेत येत असल्यामुळे क्षीण झालेला चंद्रमा उगवेल तो पहाटे ४ वाजून ८ मिनिटांनी.
- शुक्र ४ वाजून २२ मिनिटांनी  उगवेल
- आणि पाठोपाठ बुध ग्रह ४ वाजून ३५ मिनिटांनी अवतरेल.
- मंगळ ग्रहाचे दर्शन पूर्व क्षितिजावर घडेल ते  ४ वाजून ४७ मिनिटांनी
- आणि सर्वात शेवटी ग्रहांचा राजा गुरु चे आगमन होईल ते ४ वाजून ४९ मिनिटांनी.

पुढील चित्रावरुन आकाशात ग्रहांची गर्दी कशी होणार आहे याची थोडी फार कल्पना येईन.
चित्र : मायाजालावरुन  घेतले आहे. संदर्भ दुवा


From Khagol


हा नयनरम्य देखावा डोळ्यांत साठवून  ठेवण्यासाठी पहाटे ५ वाजताची वेळ योग्य आहे.
तेव्हा पहाटे ४.५५ चा गजर लावून ३० एप्रिलच्या रात्री लवकर झोपा  आणि पहाटे पाच वाजता आकाशात होणार्‍या ग्रहांच्या पार्टीला हजर रहायचे विसरु नका :)
या दिवशी सूर्योदयाची वेळ जवळपास सकाळी ६ वाजता आहे. तरीही  १ तास आधीच हा अत्भुत देखावा नजरेस पडणार असल्यामुळे आकाश निरिक्षणाची  आवड असलेल्या सर्व खगोलप्रेमींची निराशा अजिबात होणार नाही. पूर्वेच्या अर्ध्या आकाशात नुसती नजर फिरवली तरी हे सर्व ग्रह पाहता येतील.


साडेपाच वाजता आकाश साधारणतः असे दिसेन.




अर्थात सर्व ग्रहांची एकत्रित स्थिती आभासी असली तरी प्रत्यक्षात हे सर्व ग्रह करोडो मैल अंतरावर आहेत. या खगोलीय घटनेचा पृथ्वीवर कोणताही अनिष्ट परिणाम अपेक्षित नाही.
ग्रहांचा राजा गुरु आणि इतर ग्रह तुलनेने जवळ येणार असल्यामुळे सर्व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे एकत्रिकरण होऊन सूर्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होईनच. त्यातून निर्माण झालेल्या चुंबकीय शक्तीमुळे कदाचित सौरलाटा निर्माण होऊ शकतात. होतीलच असे नाही. पण ही एक शक्यता नाकारता येत नाही. सूर्यावर लाटा उसळणे ही सामान्य बाब असली तरी  तुलनेने मोठ्या आकाराच्या लाटा पृथ्वीच्या उपग्रहांद्वारे होणार्‍या दळणवळणात अडथळा आणु शकतात.  ही शक्यता असली तरी एकंदरीत त्या दिवशी काही होईल असे मला वाटत नाही.

खगोलप्रेमींनी या दुर्लभ घटनेचा लाभ घ्यावा व त्याची माहिती व्हावी  एवढेच या लेखाचे प्रयोजन.
१ मे २०११ या दिवशी सर्व आकाशनिरिक्षकांना  आकाश मोकळे मिळो व ग्रहांच्या  पार्टीत मौजमजा करायची संधी मिळो अशी मनापासूनची इच्छा :)

धन्यवाद,
~सागर

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.