Tuesday, July 2, 2013

भारताच्या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण



भारताचा आयआरएनएसएस १ ए या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचे सोमवारी १ जुलै २०१३ रोजी रात्री ११ वाजून ४१ मिनीटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथून एखाद्या उपग्रहाचे मध्यरात्री उड्डाण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीएसएलव्ही सी २२ एक्सएल या प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह अंतराळात सोडला गेला. एखाद्या उपग्रहाचा प्रक्षेपण कालावधी ठरवताना त्याची कक्षा व इतर बाबी लक्षात घेतल्या जातात. त्या गरजा रात्री ११.४१ या वेळेला पूर्ण होत असल्याने हे उड्डाण मध्यरात्री होणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी अगोदरच सांगितले होते. त्याप्रमाणे नियोजित वेळेनुसार आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह पीएसएलव्हीच्या एक्सएल या सुधारित प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. . इस्रोच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही २४ वी मोहीम आहे. हा उपग्रह उड्डाणानंतर अवघ्या वीस मिनिटात अवकाशात सोडला गेला. आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह १४२५ किलोचा असून त्याचा आयुष्यकाल १० वर्षे आहे.



वाहने शोधणे, आपत्ती व्यवस्थापन, प्रवासी व गिर्यारोहकांना दिशादर्शन, चालकांसाठी आवाजाची दिशा ओळखणे, सागरी दिशादर्शन, हवाई सर्वेक्षण असे या उपग्रहाचे उपयोग आहेत. सात उपग्रहांच्या आयआरएनएसएस प्रणालीत तीन भूस्थिर व चार सूर्यसापेक्ष कक्षेतील उपग्रह असतील, ते पृथ्वीपासून ३६ हजार कि.मी उंचीवर असतील.

Monday, July 1, 2013

सूर्याभोवतीच्या वातावरणाचे सर्वाधिक 'स्पष्ट चित्र'






लंडन- सूर्याच्या भोवतालच्या वातावरणाचे आतापर्यंतचे सर्वाधिक स्पष्ट छायाचित्र घेण्यात शास्त्रज्ञांना यश 
आले आहे. एका निरीक्षण उपकरणयुक्त अग्निबाणासोबत (साउंडिंग रॉकेट) पाठविलेल्या एका नव्या पद्धतीच्या कॅमेराच्या साहाय्याने छायाचित्रे काढण्यात आली आहेत. 

शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने सूर्यावर दिसणारा ठिणग्यांचा प्रकाश तथा आग आणि संबंधित काही गतिमान मार्गांचा वेध घेतला आहे. 
या संशोधकांनी 'नासा'तर्फे तयार करण्यात आलेला उच्च प्रतीचा कॅमेरा हा निरीक्षण उपकरणयुक्त अग्निबाणाच्या साहाय्याने वापरून सूर्याभोवतालच्या वातावरणाची छायाचित्रे मिळवली. 

ही छायाचित्रे व त्यातील तपशील हे आतापर्यंतच्या छायाचित्रांपेक्षा पाचपटीने अधिक स्पष्ट आहेत. पाच सेकंदाला एक प्रतिमा या वेगाने ही छायाचित्रे मिळवली आहेत. नव्या कॅमेऱ्याने नोंदवलेली निरीक्षणे ही अतिनील प्रकाशातील असून, ती सूर्यावरील चुंबकीयदृष्ट्या क्रियाशील भागावर केंद्रीत आहेत.


माहिती सौजन्यः सकाळ वृत्तसेवा

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.