Friday, November 26, 2010

नभात जास्त हसणारे तारे : लेखमालेची सुरुवात आणि ओळख


नभात जास्त हसणारे तारे
मित्रांनो...
शीर्षक वाचून चक्रावलात तर नाही ना? हास्य
खगोलशास्त्रात रस असणार्‍या व त्याची थोडीफार माहिती असणार्‍या जिज्ञासूंना मात्र हसणारे तारे ही कल्पना कदाचित वेगळी वाटणार नाही. कारण तार्‍यांची हसण्याची भाषा समजून घ्यायची असेल तर आपल्याला एका रात्री खगोलाकडे म्हणजेच आकाशाकडे नजर टाकावी लागेल.रस्त्याने आपण जात असताना एखादे सुरेख हास्य जसे आपले चित्त वेधून घेते तद्वतच प्रत्येक तार्‍याची तेजस्विता हे जणू त्या तार्‍याचे हसणेच असते. तर 'नभात जास्त हसणारे तारे' या लेखमालेद्वारे जिज्ञासू वाचकांना नभोमंडलातील १० तेजस्वी तार्‍यांची ओळख करुन देणे हेतू हा आहे.
From Khagol
सर्वप्रथम आपण पाहूयात की तार्‍याची तेजस्विता (Brightness) म्हणजे काय? आणि ती कशी मोजली जाते?
तार्‍याची तेजस्विता (Brightness) म्हणजे काय? 
तार्‍यांची तेजस्विता मुख्य करुन दोन घटकांवर अवलंबून असते. एक तार्‍याची दीप्ती(चकाकी), म्हणजे तो तारा किती प्रकाश फेकतो (उत्सर्जन करतो), आणि दोन, त्या तार्‍याचे आपल्यापासूनचे अंतर.
जवळच्या तार्‍यांची तेजस्विता आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर ठरवता येते (मोजता येते) त्यावरुन त्या तार्‍यांची दीप्ती (प्रकाश उत्सर्जित करण्याची क्षमता) ठरवता येते. याच्या उलट लांब असणार्‍या तार्‍यांबाबत, दुसर्‍या तारकाविश्वातील तार्‍यांबाबत, हेच गणित थोडेसे बदलून उलटे होते. या लांबच्या तार्‍यांची दीप्ती माहिती असेल तर त्यांची तेजस्विता मोजून आपल्याला या लांबच्या तार्‍यांचे अंतर ठरवणे सोपे पडते. एडविन हबल या शास्त्रज्ञाच्या असे लक्षात आले की आपल्या जवळ असणार्‍या काही विशिष्ट प्रकारच्या तार्‍यांची दीप्ती ही नेहमी सारख्याच प्रमाणात असते. यावरुन त्याने असा निष्कर्ष काढला की अशा प्रकारचे तारे दुसर्‍या तारकाविश्वात सापडले तर त्यांची दीप्ती ही तीच गृहीत धरता येईल आणि त्यावरुनच त्या तारकाविश्वाचं आपल्यापासूनचं अंतर काढता येईल. या पद्धतीने 'हबल'ने ९ तारकाविश्वांची अंतरे शोधून काढली. आणि वेगवेगळ्या निरिक्षणांतून एडविन हबलने काढलेली अंतरे बरोबर आली. त्यामुळेच लांबच्या तार्‍यांची अंतरे मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. असो आता पुढे वळूयात.
तार्‍याची तेजस्विता कशी मोजतात?
ग्रीष्म ऋतूत दिवसभर आपल्याला भाजून काढणारा सूर्य हा खूप मोठ्या प्रतीचा तारा आहे असा आपला समज होणे स्वाभाविकच आहे. पण हे खरे नाहिये. सूर्य हा अतिशय साधारण व मध्यम प्रतीचा तारा आहे. सिरिअस (व्याध), रोहीणी नक्षत्रातील अल्डेबरान् अशा प्रकारचे सहजपणे नजरेत भरणार्‍या तार्‍यांना पहिल्या प्रतीचे तारे समजले जाते. तर ही प्रतवारी कशी ठरते? तेही पाहू, पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे. पण सध्या तेजस्विता कशी मोजली जाते ते आधी पाहू.
तार्‍याची तेजस्विता मुख्य करुन दोन घटकांवर अवलंबून असते
१. तार्‍याचे तापमान आणि
२. तार्‍याचा आकार
१. तार्‍याचे तापमान :
तापमान हा घटक विचारात घेताना एक मुख्य बाब विचारात घेतली जाते. तार्‍यावरील पृष्ठभागाचे तापमान जेवढे अधिक तेवढा तो तारा जास्त उर्जा निर्माण करतो व परिणामी जास्त प्रकाश जास्त फेकतो. तर तार्‍याचे तापमान याचा आणि रंगाचाही संबंध असतो. उदाहरणार्थ आपण आकाशातले दोन तारे घेऊ. हे दोन्ही तारे एकाच तारकासमूहातले आहेत. बेटेलग्युज आणि रिगेल हे ते तारे.
From Khagol
या दोन तार्‍यांकडे नजर टाकताच एक गोष्ट सहज लक्षात येते की रिगेल तार्‍याची आभा अथवा प्रभामंडल हे नीलवर्णी आहे. तर बेटेलग्यूज तार्‍याचा रंग हा तांबूस वर्णाकडे झुकणारा आहे. तर यावरुन तापमानाचा अंदाज करता येतो.
पुढील रेखाचित्र आणि त्यानंतरचे कोष्टक या पद्धतीवर अधिक प्रकाश टाकतील.
From Khagol
From Khagol
वरील कोष्टकावरुन आपल्याला असे कळते की नीलवर्णी पृष्ठभाग असणार्‍या तार्‍याचे तापमान अधिक आहे. थोडक्यात नीलवर्णी तारा हा तसा तरुण समजायला हरकत नाही हास्य
उलटपक्षी, लाल वर्णाचा तारा हा इंधन संपत आलेला असतो त्यामुळे त्यावरचे तापमानही कमीच असते. म्हणजेच हा तारा वृद्धावस्थेतला तारा असतो.
तर वरील उदाहरणात आपण विचारात घेतलेल्या तार्‍यांपैकी कोणाचे तापमान जास्त व कोणाचे तापमान कमी हा प्रश्न आता तुम्हाला चुटकीसरशी सुटला असणार. हो की नाही?
रिगेलच्या पृष्ठभागाचे तापमान आहे?........ २०,००० केल्व्हिन ** डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ ऑरगॉन नुसार **
(काही स्त्रोतांप्रमाणे हे तापमान ११,००० केल्व्हिन समजले जाते. पण युनिव्हर्सिटी ऑफ ऑरगॉनची माहिती जास्त विश्वासार्ह वाटली)
आणि
बेटेलग्युज च्या पृष्ठभागाचे तापमान आहे? ............... ३,००० केल्व्हिन
आता दुसर्‍या घटकाकडे वळूयात. ते म्हणजे तार्‍याचा आकार
२. तार्‍याचा आकार :
तार्‍याचा आकार हा घटक आता तार्‍याची तेजस्विता ठरवण्यात केवढा महत्त्वाचा घटक ठरतो ते पाहू.
समजा दोन सारख्या तापमानाचे तारे आहेत. पण दोघांपैकी एकाचा आकार दुसर्‍या तार्‍याच्या पाचपटीने मोठा आहे. तर अशा वेळी तार्‍यांची उर्जा उत्सर्जन करण्याची क्षमता प्रति युनिट या दराने काढली जाते व त्यांच्या आकारमानाप्रमाणे ही तेजस्विता मोजली जाते. म्हणजे १ एवढा आकार असलेल्या तार्‍याची तेजस्विता १ गृहीत धरली तर या तार्‍यापेक्षा पाच पटीने मोठा आकार असलेल्या तार्‍याची तेजस्विता ही नक्कीच जास्त भरेल. तर असे हे सर्वसाधारण गणित तार्‍यांची तेजस्विता मोजताना गृहीत धरले जाते.
या लेखात आपण पुढील १० तेजस्वी तार्‍यांचा उलट्या क्रमाने म्हणजे तेजस्वितेच्या निकषाप्रमाणे परामर्श घेऊयात.
१०. बेटेलग्यूज (BETELGEUSE) (मराठी नावः काक्षी)
०९. अ‍ॅचेर्नार (ACHERNAR)
०८. प्रोक्योन (PROCYON)
०७. रिगेल (RIGEL)
०६. कॅपेल्ला CAPELLA
०५. व्हेगा (VEGA)(मराठी नावः अभिजीत)
०४. अ‍ॅक्टरस (ARCTURUS)
०३. अल्फा सेंच्युरी (ALPHA CENTAURI)
०२. कॅनोपस (CANOPUS)
०१. सिरस (SIRIUS) (मराठी नावः व्याध)
वरीलपैकी बहुतेक तारे पुढील तारकासमूहात दिसतात.
From Khagol
From Khagol
From Khagol
नभात हसणार्‍या या तार्‍यांनी मला जसे रोमांचीत केले तसे तुम्हालाही हे तारे हसवतील याची खात्री वाटते हास्य
धन्यवाद,
सागर भंडारे
खुलासा: या लेखात वापरण्यात येणारी अथवा वापरली गेलेली सर्व छायाचित्रे मायाजालावरुन घेण्यात आलेली आहेत. त्या छायाचित्रांचे हक्क त्या त्या संस्थेकडे राखीव आहेत.

Saturday, November 13, 2010

तारे आणि आकाशगंगा

पहिला प्रश्न :
तारा कसा तयार होतो?  व कोणते घटक तार्‍याच्या निर्मितीत भूमिका बजावतात ?
तारे आणि आकाशगंगा:
तार्‍यांमध्ये मुख्य प्रक्रिया असते ती ज्वलनाची आणि या ज्वलनासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचे काम करतात ते हेलियम आणि हायड्रोजन हे वायू. तरीपण तार्‍याला स्वतःचा असा एक द्रवस्वरुप गाभा असतोच. तारा म्हणजे थोडक्यात अंतराळात जळत राहणारी एक भट्टीच असते. अंतराळात प्रचंड शीत तापमान असते. हे तापमान तार्‍यावर परिणाम करतच असते त्यामुळेच प्रतिक्रिया तत्त्वानुसार तार्‍यांमध्ये ही ज्वलनप्रक्रिया सतत चालूच असते. जेव्हा हा इंधनाचा साठा संपत येतो तसतसे तार्‍याचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत जाते आणि परिणामी तो फुगत जातो. आणि शेवटी राक्षसी तार्‍यात परिवर्तित होतो. याच्याही पुढची पायरी म्हणजे राक्षसी तार्‍याचे स्फोटात रुपांतर होते (सुपरनोव्हा). उत्पत्ती स्थिती आणि लय हा विश्वाचा नियम म्हटले तरी चालेल. त्यामुळेच आपल्याला एकाच वेळी विश्वात वेगवेगळ्या ठिकाणी ही सर्व उदाहरणे दिसतात.
तार्‍यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि मुख्यतः हायड्रोजन वायू यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. क्रॅब अभ्रिका (क्रॅब नेब्युला) हे याचेच एक उदाहरण आहे. याबद्दल अधिक माहिती याच समुदायातील नेब्युला या लेखात मिळेल. उर्टचा तेजोमेघ हाही एक तेजोमेघ आहे.  मुळात उर्टचा तेजोमेघ हा पृथ्वीपासून साधारण ५० खगोलीय एकक (जवळपास एक प्रकाशवर्ष ) अंतरावर आहे. एवढ्या जवळ तार्‍यांची निर्मिती झाली तर आपले काही खरे नाही. अर्थात या उर्टच्या मेघाबद्दल शास्त्रज्ञांमध्येच एकमत नसले तरी धूमकेतूंना जन्म देणारा मेघ म्हणून उर्टचा मेघ ओळखला जातो.
त्यानंतर विश्वातले गुरुत्वीय बल या तेजोमेघातील अणूंना आकर्षित करतात व त्यामुळे ते जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. एका विशिष्ट मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. येथेही वैश्विक गुरुत्त्वबल कार्य करते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. येथे प्रत्येक तार्‍याची घनता ठरण्यामागे सुरुवात होते असे म्हटले तर योग्यच राहील. गाभ्याकडे ढासळणार्‍या (खरे तर ओढल्या जाणार्‍या) अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार (उर्जा ही कधीही नष्ट होत नाही तर ती दुसर्‍या रुपात परावर्तित होते) या गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि प्राथमिक अवस्थेतील तार्‍याचा जन्म होतो. अशा तार्‍यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे या प्राथमिक अवस्थेतील तार्‍यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून हे तारे पाहता येतात. (अवरक्त किरण आणि अतिनील किरण यावर लोकसत्ता दैनिकातील या दुव्यावरुन अधिक माहिती मिळेल)
काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठराविक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्‍या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते. व्याधाचा तारा हा अशाच जुळ्यातार्‍यांच्या निर्मितीचे एक उदाहरण आहे.
सिरिअस हा श्वेतवर्णी दिसतो याचे मुख्य कारण व्याध हा द्वित तारा हे आहे. यातील सिरिअस-ब आकाराने सर्वात लहान तारा आहे त्याच्यात प्रचंड घनता आहे, हा श्वेतबटू आहे. व्हाईट ड्वार्फ या नावातच त्याच्या श्वेत रंगाचे उत्तर येते.
ओढून घेण्याची प्रचंड क्षमता असल्यामुळे हा तारा दुसर्‍या मोठ्या तार्‍याला आपल्याभोवती फिरवत असतो. या दुसर्‍या तार्‍याच्या  (सिरिअस-अ) पृष्ठभागाचे तापमान साधारणत: १०,००० डिग्री आहे. यामुळेही या तार्‍याची  चमक वाढते.
मुळात सिरिअस-अ आणि सिरिअस-ब यापैकी सिरिअस-ब हा तारा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. पण हा चिमुरडा सिरिअस-अ ला स्वतःभोवती फिरवतो. सिरिअस-ब चा पृष्ठभाग प्रचंड घनतेमुळे जास्त कठीण आहे. हिर्‍याला आपण कठीण म्हणून ओळखतो. तर सिरिअस-ब चा पृष्ठभाग हिर्‍यापेक्षा ३०० पटींनी जास्त कठीण आहे, यावरुन कल्पना येईल.  तर हे दोन तारे एकमेकांभोवती फिरताना सिरिअस-अ चा वायू व द्रव भाग सिरिअस-ब आपल्याकडे खेचून घेतो त्यामुळे दोघांभोवती प्रचंड मोठे मॅग्नेटिक फिल्ड तयार होते. यामुळे बाकीचे रंग यात शोषले जातात असे म्हटले तरी चालेल. पण मुख्यत्वे सिरिअस-ब तार्‍याच्या भूमिकेमुळे आणि मॅग्नेटीक फिल्डमुळे सिरिअस-अ तार्‍याला खूप चकाकी येते. आणि या चकाकीमुळेच हा तारा शुभ्र पांढरा दिसतो.
सिरिअस अ आणि ब एकमेकांसमोर आले की ( पृथ्वीच्या दिशेने) असे दिसतात :
दुसरा प्रश्न :

युनिव्हर्सचा उगम बिग बॅगच्या वेळी (सुमारे 12,000,000,000 वर्ष आधी) झाला अस मानतात, तर हे तारे ईतक्या कमी कालावधीत एक्मेकांपासुन ईतके दुर कसे गेले? थोडक्यात काही वर्षात युनिव्हर्सचा विस्तार काही प्रकाशवर्ष कसा झाला?
मुळात बिग बँग थिअरी हा एक तर्क आहे. विस्फोटातून विश्वाची उत्पत्ती झाली असे मानले तरी त्या सिद्धांतानुसार विश्व प्रसरण पावले पाहिजे. मुळात स्फोट कशाचा झाला? कोठे झाला याचे पुरावे शोधण्याएवढा आवाका मानवाचा असेल असे मला नाही वाटत. विश्वाचा पसारा हा खूप प्रचंड आहे. केवळ बिग-बँग थिअरी मान्य केली तरी विस्फोटाच्या मूलभूत सिद्धांतानुसार स्फोट झाल्यावर सर्व वस्तू विश्वात प्रसरण पावल्या पाहिजे. तसे असेल तर अ‍ॅन्ड्रोमेडा ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेने प्रवास करते आहे आणि काही वर्षांनी (साडेचार बिलियन वर्षांनी) आपल्या आकाशगंगेला धडकणार आहे याचे स्पष्टीकरण विस्फोट सिद्धांतात बसत नाही.
तरीपण हा सिद्धांत खरा मानला तरी विस्फोट हा गती प्रदान करतो आणि ही गती सर्वस्वी स्फोटावर अवलंबून असते. प्रचंड मोठा विस्फोट झालेला असेल तर गती कितीही असू शकते. आणि एवढा काळ अवकाशाच्या तुलनेत लहानच – नगण्यच आहे पण आपल्या गणनेप्रमाणे मोठा आहे.
बाकी ही अ‍ॅन्ड्रोमेडा आकाशगंगा अगदी सुंदर दिसते. ही पहा

तार्‍यांमधील अंतर कसे मोजतात? आणि त्याची रचना कशी ओळखतात?

१.प्रकाश आला तरी तो किती जुना हे कसे ओळखतात?

प्रकाश किती जुना आहे
१ प्रकाशवर्ष = ९४,६०,००,००,००,०००  कि.मी.
आता हे कसे काढले?

तर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर मोजायचे झाल्यास ते किलोमीटरमध्ये साधारण ३,८४,००० कि.मी. होते. परंतू त्यापूढील अंतर (तार्‍यांचे) प्रचंड मोठे असल्याने ती किलोमीटरमध्ये मोजणे अशक्य होते. म्हणजे मोजले तरी ते आकलनाच्या दृष्टीने फारसे उपयोगी नसते. जसे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर साधारण १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते. अशी मोठी अंतरे किलोमीटरमध्ये मोजणे शक्य नसल्याने आणि गणनेच्या दृष्टीकोनातून गैरसोयीचे असल्यामुळे त्यासाठी 'खगोलीय एकक'  (Astronomical Unit - A.U.) ही पद्धती वापरतात. खगोलीय अंतरे मोजण्याची एकके या लेखात अधिक माहिती मिळेलच. पण इथे अजून स्पष्ट करुन सांगतो.

एका सेकंदामध्ये प्रकाश      २,९९,७९२.४५८  कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका मिनिटामध्ये प्रकाश  १,७९,८७,५४७.४८   कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका तासामध्ये प्रकाश  १,०७,९२,५२,८४८.८   कि.मी. इतके अंतर पार करतो.
एका दिवसामध्ये प्रकाश २५,९०,२०,६८,३७१.२  कि.मी. इतके अंतर पार करतो.
या वेगाने प्रकाश
एका वर्षामध्ये प्रकाश   ९४,६०,००,००,००,०००  कि.मी. इतके अंतर पार करतो.

आणि मुख्य म्हणजे प्रकाशाचा वेग हा सर्वत्र सारखा असतो. म्हणून हेच प्रमाण मानून लांब पल्ल्याची अंतरे मोजणे अधिक सोपे पडते. आता उदाहरणार्थ
पृथ्वी ते चंद्र हे अंतर ३,८५,००० किलोमीटर आहे. प्रकाशाच्या वेगाच्या गणितानुसार हे अंतर प्रकाश फक्त १.३ सेकंदात पार करतो.
तसेच सूर्य ते पृथ्वी हे अंतर १४९, ५९७, ८९० कि. मी. आहे. हे अंतर कापण्यास प्रकाश ८.६ मिनिटे एवढा वेळ घेतो.
तार्‍यांची अंतरे किलोमीटरमधे मोजण्यापेक्षा एका वर्षात प्रकाश जे अंतर कापतो तेवढे अंतर प्रकाशवर्ष म्हणून वापरणे सोयीचे पडते. यानुसार,
पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा अल्फा सेंटारी हा पृथ्वीपासून सव्वा-चार प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

आकाशगंगेचा व्यास १,००,००० प्रकाशवर्षे आहे. तर आपल्या सर्वात जवळची आकाशगंगा २२,००,००० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.
या अवाढव्य अंतराच्या गणनेवरुन प्रकाशवर्ष या एककाचे महत्त्व लक्षात यावे.

आपण रात्री जे तारे पाहतो त्यातील एखादा तारा आपल्या पासून १०० प्रकाशवर्ष दूर आहे म्हणजेच त्याच्यापासून निघालेला प्रकाश १०० वर्षे प्रवास केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतो. समजा जर त्या तार्‍याचा स्फोट झाला. तर आपणास तो स्फोट १०० वर्षांनी पाहायला मिळेल. याचाच अर्थ आपण जे तारे पाहतो ते तारे भूतकाळातील असतात.

२.हे तारे अनेक प्रकाशवर्ष दुर असुनही त्यांचे आकारमान, भ्रमणगती, ई.चा अंदाज कसा काढतात?

याच्या अनेक विविध पद्धती आहेत. पॅरालाक्स (Parallax) ही पद्धत मुख्यत्वे करुन वापरली जाते. पण ही पद्धत तारे काही हजार प्रकाषवर्षे अंतरावर असतील तरच वापरली जाते. त्याच्या पलिकडील तार्‍यांबद्दल माहिती गोळा करताना दुसर्‍या पद्धतींचा वापर केला जातो.
तर पॅरालाक्स या पद्धतीत (मराठीत हिला लंबन म्हणतात)
दोन भिन्न बिंदूंपासून एकच वस्तू पाहताना जो कोणीय बदल दिसतो त्याला लंबन अथवा पॅरालाक्स म्हणतात. पुढील चित्रावरुन हे स्पष्ट व्हावे.या चित्रावरुन आपल्याला ध्यानात येईल की दोन भिन्न बिंदूंतून घेतलेल्या एकाच वस्तूतील कोणीय बदल व त्याच्या मागे निर्माण झालेली पार्श्वभूमी याचा आधार घेतला जातो.

जवळची आणि लांबची वस्तू यांचे अंतर जाणवण्याचे साधे गणित पुढील चित्रावरुन स्पष्ट होईल.पृथ्वी स्वतः सूर्याभोवती फिरत असते त्यामुळे एकदा नोंदी घेतल्या की पुन्हा सहा महिन्यांनी या नोंदी पुन्हा घेतल्या जातात त्यानंतरच कोणीय बदल ध्यानात येतो. पुढील छायाचित्र ही गोष्ट स्पष्ट करु शकेल.या व्यतिरिक्त त्या तार्‍याची स्पंदनक्षमता, स्पंदनाचा दर, त्याची तेजस्विता, वर्णपट, रेडिओ लहरी,  इत्यादी गोष्टी देखील तार्‍यांचे अंतर आणि त्याचा आढावा घेण्यासाठी वापरतात. खगोलशास्त्र ही एक मोठी शाखा असली तरी त्याच्या अनेक उपशाखाही आहेत ज्यांमध्ये या गोष्टींचा जास्त सखोल अभ्यास होतो

Sunday, November 7, 2010

राक्षसी तारे : एक तुलनात्मक आढावा

या दुव्यावर ही माहिती उपलब्ध आहे. 


या दुव्यातील छायाचित्रे पाहून लक्षात येते की आपले विश्वातील स्थान किती नगण्य आहे ते.पण तरीही आपण एक प्रगत संस्कृती म्हणून महान आहोतच. कारण हे विश्व मापण्याचा प्रयत्न करणारे आपणच एकमेव आहोत :) (किमान आपल्या माहितीत तरी)

राक्षसी तारे  तुलनात्मक छायाचित्रे :


१. आपल्या पृथ्वीच्या तुलनेत प्लुटो व इतर लहान आकाराचे ग्रहः

From Khagol


२. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :

From Khagol३. आपला सूर्य आणि आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह यांचे तुलनात्मक आकार :

From Khagol


४. आपला सूर्य , सिरियस तारा (हा श्वेत बटूसह जोडतारा आहे), पोलॉक्स आणि अ‍ॅक्टरस तारा यांचे तुलनात्मक आकार  :


From Khagol


५. सूर्य व अ‍ॅक्टरस या तार्‍यांची बेटेलग्यूज (काक्षी) व अ‍ॅन्टारस या ज्ञात असलेल्या सर्वात मोठ्या राक्षसी तार्‍यांबरोबर तुलनात्मक दृष्ट्या आकारः

From Khagol