Tuesday, October 2, 2012

२०१३ साली आकाशात आयसॉन धूमकेतूचे राज्य

आकाशनिरीक्षकांसाठी एक चमकती भेटवस्तू नभांगणात प्रतीक्षा करीत आहे. तो आहे एक धूमकेतू. नव्यानेच शोधलेला हा धूमकेतू हा चंद्रापेक्षाही जास्त प्रकाशमान आहे असा दावा भारतीय वंशाच्या वैज्ञानिकासह काही खगोलवैज्ञानिकांनी केला आहे. 
रशियाच्या खगोलवैज्ञानिकांनी अलीकडेच २०१२ एस १ (आयसॉन) हा धूमकेतू शोधला असून, तो पृथ्वीपासून ९ कोटी किलोमीटर अंतरावर आहे, असे ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या नियतकालिकाने म्हटले आहे. सध्या तो शनि व गुरू यांच्या दरम्यान असून फिकट दिसत आहे, पण जेव्हा तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने जवळ येईल त्या वेळी त्याच्यावरील धूळ व बर्फ निघून जाईल व त्याचा पिसारा अधिक प्रकाशमान दिसू लागेल. हा धूमकेतू मुळातच चमकदार असून, त्याचे सूर्यापासून अंतर कसे बदलत जाते यावर ते अवलंबून आहे असे भारतीय वंशाचे खगोलवैज्ञानिक रामिंदर सिंग सामरा यांनी सांगितले. तीन किलोमीटर रुंदीचा हा धूमकेतू असून २०१३ च्या शेवटच्या महिन्यांमध्ये व २०१४च्या सुरुवातीला तो अधिक प्रखर दिसेल. जर हे सगळे खरे ठरले तर तो खगोल इतिहासातील सर्वात तेजस्वी धूमकेतू ठरेल असे कॅनडाच्या एच. आर. मॅकमिलन अंतराळ केंद्रात काम करणारे सामरा यांनी ‘नॅशनल जिऑग्राफिक’ला सांगितले.
१६९०मध्ये एक महाधूमकेतू दिसला होता. त्याच्याच मार्गाने हा धूमकेतूही येत आहे. तो मंगळापासून १ कोटी किलोमीटर अंतरावरून जाईल व तेथील क्युरिऑसिटी या रोव्हरलाही त्याची काही सुंदर छायाचित्रे टिपता येतील. धूमकेतू किती प्रकाशमान दिसेल याबाबत सावधानता बाळगणे गरजेचे आहे, कारण यापूर्वी असे अंदाज अनेकदा चुकले आहेत असे सामरा यांनी सांगितले.
माहितीचा स्त्रोत : लोकसत्तामधील बातमी

Saturday, August 25, 2012

मंगळावर 'क्युरिओसिटी' रोव्हर ने नेमके काय पाहिले?

माहितीचे काही दुवे:


पार्श्वभूमी:
अलिकडेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधनाचा सर्व भार वाहणार्‍या 'नासा' या संस्थेमार्फत 'क्युरिओसिटी' रोव्हर ने घेतलेली काही छायाचित्रे सार्वजनिक केली गेलीत. त्या फोटोंपैकी एका फोटोत क्षितिजावर दिसत असलेल्या चार प्रकाशकणांचे अस्तित्त्व अनेकांना खटकले. कित्येकांच्या मते ते प्रकाशकण म्हणजे उडत्या तबकड्या (यु.एफ.ओ.) आहेत आणि दूर राहून मानवाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तर नासाच्या वतीने तो फोटोमधील एक तांत्रिक दोष असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

हा तो मूळ फोटो:

हे या मूळ फोटोचे (युएफओ च्या अस्तित्त्वासाठी पूरक असे - केलेले? -) पृथक्करणः

नासाच्या वैज्ञानिकांनी फोटोमधील तंत्रातील त्रुटीमुळे निर्माण झालेले डाग आहेत असे म्हटलेले आहे. (येथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नासाने ते ४ ठिपके अंतराळातील कोणत्यातरी तार्‍याचे असावेत असे अजिबात म्हटलेले नाहिये) फोटो पाहिल्यावर ते डाग आहेत असे वाटत नाही. कारण डागांना पसरणारा प्रकाश नसतो. ऐसी अक्षरे च्या सदस्यांचे या बद्दल मत काय आहे ते माहिती करुन घ्यायला आवडेल. येथे मी फक्त माहिती देतोय, माझी मते नाहीत. पुढे लवकरच माहिती देईनच.

मंगळावर यशस्वीपणे उतरुन एक इतिहास निर्माण करणार्‍या 'क्युरिओसिटी' या रोव्हर च्या या मोहिमेकडे अवघ्या जगातील शास्त्रज्ञांचे व काही प्रमाणात सर्वसामान्यांचेही लक्ष आहे. रोव्हर चा शब्दशः अर्थ भ्रमण करणारा वा फिरणारा असा होतो. समुद्री चाच्यांसाठी देखील हा शब्द वापरला जातो. त्यामुळे क्युरिओसिटी रोव्हर चे मराठी रुपांतर "जिज्ञासू भटक्या" अथवा "जिज्ञासू लुटारु" असे ढोबळमानाने करता येईल. अर्थात हा प्रस्तुत लेखाचा वा चर्चेचा महत्त्वाचा विषय नसल्यामुळे आपण 'क्युरिओसिटी रोव्हर' हाच शब्दप्रयोग करुयात. तर या धाग्याद्वारे 'क्युरिओसिटी' रोव्हरने काढलेल्या फोटोंवरून नव्याने कोणते वादळ बातम्यांच्या जगात गाजते आहे? आणि त्यात तथ्य किती आहे? अशा विषयावर चर्चा करुयात. पुढे लवकरच माहिती देईन.

Sunday, August 12, 2012

सप्टेंबर-२०१२ पासून "खगोलविश्व" नियमित

नमस्कार मित्रांनो,

'खगोलविश्व'च्या माध्यमातून मी इतके दिवस खगोलशास्त्रातील ज्ञान आणि खगोलीय घटना मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या प्रयत्नाला वेळेची कोणतीही शिस्त नव्हती. याची मला पुरेपुर जाणीव होती व आहे. माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव आणि व्यस्ततेमुळे मला 'खगोलविश्व' कडे लक्ष देणे शक्य झाले नव्हते.

पण येत्या सप्टेंबर महिन्यापासून दर पंधरवड्याला एक लेख वाचकांना नक्की देण्याचा मनोदय आहे याशिवाय दिवाळीपर्यंत खगोलविश्व एका नव्या आकारात व स्वरुपात तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद,
-सागर

Sunday, June 3, 2012

आपल्या आयुष्यातले शेवटचे शुक्राचे अधिक्रमण

आपल्या सर्वांच्या आयुष्यातले शेवटचे शुक्राचे अधिक्रमण

सूर्यमालेतील अत्यंत दुर्मिळ घटनांपैकी एक घटना असते ती म्हणजे ग्रहांचे सूर्यबिंबासमोरुन झालेले अधिक्रमण अथवा पारगमन किंवा संक्रमण. हे दुर्मिळ आणि खगोलीय दृष्टीकोनातून अत्भुत दॄश्य संपूर्ण भारतात येत्या ६ जून २०१२ रोजी दिसणार आहे. शुक्र ग्रहाचे सूर्यावरील हे अधिक्रमण पाहणारे सर्व लोक आपल्या यापुढील आयुष्यात पुन्हा हे दृष्य पाहू शकणार नाहीत. कारण यापुढील शुक्र ग्रहाचे सूर्यावरील अधिक्रमण हे १०५ वर्षांनंतर २,११७ साली दिसणार आहे. तेव्हा अशी सुवर्णसंधी दवडू नका. पश्चिम आकाशाकडे एक नजर टाकताच लक्षात येते की शुक्र ग्रह सूर्याच्या खूप जवळ चालला आहे. कोणत्याही ग्रहाचे सूर्यावर अधिक्रमण हे दृश्य खूप दुर्मिळ यासाठी आहे की पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मधे फक्त बुध व शुक्र हे दोनच ग्रह आहेत. व या दोन ग्रहांची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मधे येते म्हणूनच सूर्यावरचे अधिक्रमण फक्त याच दोन ग्रहांचे - बुध व शुक्र - दिसू शकते. १६०९ साली दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर आतापर्यंत सूर्यावरील अधिक्रमणाच्या फक्त सात घटना घडलेल्या आहेत. व आठवे अधिक्रमण ६ जून २०१२ रोजी घडणार आहे.

ग्रहांच्या अधिक्रमणाचे स्वतःचे एक विशेष महत्त्व आहे. १८ व्या शतकात शुक्राच्या अधिक्रमणामुळे पहिल्यांदाच सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर अधिक अचूकतेने मोजण्यात आले होते. याच अधिक्रमणाच्या काळात शुक्र ग्रहावर वातावरण असल्याचाही शोध लागला होता. शुक्र ग्रहाचे अधिक्रमण १,००० वर्षांत फक्त १२ वेळा होते. १२१.५ वर्षांनंतर आठ वर्षांच्या अंतराने २ अधिक्रमणे होतात. २०व्या शतकात कोणतेही अधिक्रमण झालेले नव्हते. सन १८७४ आणि १८८२ ला जोडीने झालेल्या अधिक्रमणानंतर पहिले अधिक्रमण ८ जून २००४ रोजी झाले होते. याच जोडीतले दुसरे अधिक्रमण येत्या ६ जून २०१२ रोजी होत आहे. शुक्राच्या अधिक्रमणाची ही घटना यापुढे सन २,११७ व २,१२५ सालीच होणार आहे. तेव्हा हौशी खगोलप्रेमींनी आपल्या आयुष्यातली शुक्राच्या अधिक्रमणाची ही संधी दवडू नका व नक्की या नेत्रसुखद दृश्याचा आनंद घ्या Smile

Tuesday, January 24, 2012

खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...

२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती

२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.
पण या महिन्याच्या महिन्याच्या, म्हणजे अजून २ दिवसांत शुक्राचा अभिमान गळून पडणार आहे.

असे असले तरी चंद्राला शुक्राच्या परिसस्पर्शाने जे सौंदर्य लाभणार आहे ते अत्भुत असणार आहे.
चंद्राची कोर आणि शुक्राची चांदणी एकमेकांच्या अगदी जवळ असे हे मनोरम दृष्य आपल्या सर्वांना पहावयास मिळणार आहे. नशीब चांगले असेल तर ही शुक्राची चांदणी चंद्रकोरीच्या अगदी वर पाहता येईल. संध्याकाळी साडेसहा ते पावणे आठच्या आसपासपर्यंत हे दृष्य दिसेल.
From Khagol

या घटनेनंतर जवळपास दर दिवशी आकाशात पुढील सुंदर दृश्ये पहावयास मिळतील :)

२७ जाने. २०१२:

From Khagol

२९ जाने. २०१२:

From Khagol



३० जाने. २०१२: (गुरु चंद्र युति

From Khagol

३१ जाने. २०१२:

From Khagol

तेव्हा पहा आणि कसे वाटले ते अवश्य कळवा


डिस्क्लेमरः लेखात वापरलेली चित्रे जालावरुन घेतली आहेत व आवश्यकतेनुसार त्यात बदल केले आहेत. या चित्रांचे सर्वाधिकार त्या त्या संस्थांकडे सुरक्षित आहेत.

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.