Saturday, August 25, 2012

मंगळावर 'क्युरिओसिटी' रोव्हर ने नेमके काय पाहिले?

माहितीचे काही दुवे:


पार्श्वभूमी:
अलिकडेच अमेरिकेच्या अंतराळ संशोधनाचा सर्व भार वाहणार्‍या 'नासा' या संस्थेमार्फत 'क्युरिओसिटी' रोव्हर ने घेतलेली काही छायाचित्रे सार्वजनिक केली गेलीत. त्या फोटोंपैकी एका फोटोत क्षितिजावर दिसत असलेल्या चार प्रकाशकणांचे अस्तित्त्व अनेकांना खटकले. कित्येकांच्या मते ते प्रकाशकण म्हणजे उडत्या तबकड्या (यु.एफ.ओ.) आहेत आणि दूर राहून मानवाच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तर नासाच्या वतीने तो फोटोमधील एक तांत्रिक दोष असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

हा तो मूळ फोटो:

हे या मूळ फोटोचे (युएफओ च्या अस्तित्त्वासाठी पूरक असे - केलेले? -) पृथक्करणः

नासाच्या वैज्ञानिकांनी फोटोमधील तंत्रातील त्रुटीमुळे निर्माण झालेले डाग आहेत असे म्हटलेले आहे. (येथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की नासाने ते ४ ठिपके अंतराळातील कोणत्यातरी तार्‍याचे असावेत असे अजिबात म्हटलेले नाहिये) फोटो पाहिल्यावर ते डाग आहेत असे वाटत नाही. कारण डागांना पसरणारा प्रकाश नसतो. ऐसी अक्षरे च्या सदस्यांचे या बद्दल मत काय आहे ते माहिती करुन घ्यायला आवडेल. येथे मी फक्त माहिती देतोय, माझी मते नाहीत. पुढे लवकरच माहिती देईनच.

मंगळावर यशस्वीपणे उतरुन एक इतिहास निर्माण करणार्‍या 'क्युरिओसिटी' या रोव्हर च्या या मोहिमेकडे अवघ्या जगातील शास्त्रज्ञांचे व काही प्रमाणात सर्वसामान्यांचेही लक्ष आहे. रोव्हर चा शब्दशः अर्थ भ्रमण करणारा वा फिरणारा असा होतो. समुद्री चाच्यांसाठी देखील हा शब्द वापरला जातो. त्यामुळे क्युरिओसिटी रोव्हर चे मराठी रुपांतर "जिज्ञासू भटक्या" अथवा "जिज्ञासू लुटारु" असे ढोबळमानाने करता येईल. अर्थात हा प्रस्तुत लेखाचा वा चर्चेचा महत्त्वाचा विषय नसल्यामुळे आपण 'क्युरिओसिटी रोव्हर' हाच शब्दप्रयोग करुयात. तर या धाग्याद्वारे 'क्युरिओसिटी' रोव्हरने काढलेल्या फोटोंवरून नव्याने कोणते वादळ बातम्यांच्या जगात गाजते आहे? आणि त्यात तथ्य किती आहे? अशा विषयावर चर्चा करुयात. पुढे लवकरच माहिती देईन.

Sunday, August 12, 2012

सप्टेंबर-२०१२ पासून "खगोलविश्व" नियमित

नमस्कार मित्रांनो,

'खगोलविश्व'च्या माध्यमातून मी इतके दिवस खगोलशास्त्रातील ज्ञान आणि खगोलीय घटना मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या प्रयत्नाला वेळेची कोणतीही शिस्त नव्हती. याची मला पुरेपुर जाणीव होती व आहे. माझ्या काही वैयक्तिक कारणास्तव आणि व्यस्ततेमुळे मला 'खगोलविश्व' कडे लक्ष देणे शक्य झाले नव्हते.

पण येत्या सप्टेंबर महिन्यापासून दर पंधरवड्याला एक लेख वाचकांना नक्की देण्याचा मनोदय आहे याशिवाय दिवाळीपर्यंत खगोलविश्व एका नव्या आकारात व स्वरुपात तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन.

धन्यवाद,
-सागर