Thursday, December 12, 2013

आयसॉनच्या ठिकर्‍या विसरा आणि आकाशातली दिवाळी पहा

येणार येणार म्हणून गाजलेल्या आयसॉन धूमकेतूच्या सूर्याच्या उष्णतेमुळे ठिकर्‍या उडाल्या आणि लाखो खगोलप्रेमींच्या अपेक्षांचा चुराडा झाला. असो. तरी पण खगोलप्रेमींनी निराश होण्याचे कारण नाही.
माझे एक हौशी खगोलनिरिक्षक मित्र श्री. मंदार मोडक यांनी माझ्या निदर्शनास आकाशात साजरी होणारी एक महत्त्वाची दिवाळी निदर्शनास आणून दिली आहे.

ती खगोलीय घटना जशीच्या तशी श्री. मंदार मोडक यांच्याच शब्दांत:


"
आज १३ आणि उद्या १४ डिसेंबरला सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह असा Geminids
उल्का वर्षाव आहे. यात ताशी १०० उल्काही दिसू शकतात. मागील वर्षी मी पाहिल्या होत्या. पण यावर्षी रात्रभर एकादशीचा मोठा चंद्र आहे. त्यामुळे बहुतेक उल्का झाकोळ्ल्या जातील. पण उद्या पहाटे चंद्र ४:१५ ला मावळेल. मग आकाश अंधारेल. पश्चिम आकाशात  मिथुन राशीतून किमान ६ वाजेपर्यंत उल्का दिसतील. तेजस्वी गुरू मिथुनेतच मुक्कामाला आहे.
१३/१४ हाच Peak आहे. शक्य असल्यास आज रात्रीही पाहण्यास हरकत नाही. पण उद्या पहाटे ४:१५ ते ६:०० हीच योग्य वेळ ठरेल.
मुख्य म्हणजे आकाश निरभ्र आहे.
पहा www.earthsky.org
पहा www.imo.net
"

खगोलप्रेमींची १३ व १४ डिसेंबरची रात्र अजिबात निराशा करणार नाही. मी देखील हा उल्कावर्षाव खूप वेळा  पाहिला आहे व माझी कधीच निराशा झाली नाही. तेव्हा वर्षातील सर्वात मोठा महोत्सव असलेल्या या उल्का वर्षावाची दिवाळी साजरी करण्यास सज्ज व्हा.

जेमिनाईड्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भव्य उल्कावर्षावासाठी पुढील २ नकाशांची मदत नक्की होईल.



नकाशे जालावरुन साभार

Thursday, November 28, 2013

आयसॉन धूमकेतूचे टप्प्यात येणे लांबले

खगोलविश्वः २८ नोव्हेंबर २०१३, गुरुवार
बहुप्रतिक्षित आयसॉन या धूमकेतूचे मानवाच्या साध्या डोळ्यांच्या टप्प्यात येणे थोडेसे लांबले आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार अर्थात खगोलतज्ज्ञांच्या अंदाजानुसार २७ नोव्हेंबर २०१३ च्या आसपास आयसॉन दिसणे अपेक्षित होते. पण आयसॉन धूमकेतू वेगाने सूर्याच्या जवळ जातो आहे. त्यामुळे सूर्याच्या तेजात तो साध्या डोळ्यांना दिसणे शक्य नाहिये. जस जसा आयसॉन सूर्याच्या जवळ जाईन तसतसा सूर्याच्या २७४० डिग्री एवढ्या तीव्र तापमानात – बर्फ आणि शिला यांच्यापासून तयार झालेला – हा धूमकेतू टिकू शकेल की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एवढ्या तीव्र तापमानामुळे आयसॉनवर स्फोट होणार आहेत हे नक्की. त्यातून हा धूमकेतू वाचला तर ३ डिसेंबरच्या आसपास आयसॉन नुसत्या डोळ्यांनी दिसू शकेल. त्यानंतरचा देखावा मात्र नेत्रसुखद असेन यात शंका नाही. कारण आयसॉन सूर्यापासून थोडा लांब आलेला असेल व बर्फ वितळून आयसॉनची शेपूटही तयार झालेली असेल. निसर्गाचे चमत्कार खरोखर अत्भुत असतात. पण त्यांच्या मुळाशी विज्ञानाची अतिशय प्राथमिक गणिते असतात. ती सर्वसामान्यांनी लक्षात घेतली पाहिजे.
आयसॉन धूमकेतूचे दुर्बिणीतून टिपलेले ताजे चित्र:
Image
धूमकेतूची शेपूट कशी तयार होते?
सूर्याच्या अती उष्णतेमुळे कोणत्याही धूमकेतूवर जमा झालेला बर्फाचा थर वितळत तो धूमकेतूपासून मागे उरत जातो. मागे उरलेले हे कणच प्रकाश परावर्तित करुन धूमकेतूची शेपूट असल्याचा आभास आपल्याला करुन देतात. हा नेत्रसुखद देखावा पाहिला की मग निसर्गाचे हे अत्भुत वाटणारे कोडे सोपे असल्यासारखे वाटू लागते. तरीही ते आपल्याला अगम्यच वाटत राहते.
तर मित्रांनो – निसर्गाच्या या शक्तीकडे प्रार्थना करा की सूर्याच्या जवळ जाऊन आयसॉनचे तुकडे होऊ नयेत आणि ३ डिसेंबरच्या सुमारास आम्हाला तुझ्या अत्भुत सौंदर्याचे दर्शन या आयसॉन धूमकेतूच्या रुपाने घडू देत.
धन्यवाद
-सागर
आयसॉन धूमकेतूला आकाशात कोठे शोधता येईल त्यासाठीचा ताजा नकाशा सोबत जोडला आहे.
Image

छायाचित्रे सौजन्यः या लेखातील छायाचित्रे वा रेखाटने जालावरुन घेतलेली आहेत. त्यांचे अधिकार संबंधितांकडे सुरक्षित आहेत.

Tuesday, July 2, 2013

भारताच्या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण



भारताचा आयआरएनएसएस १ ए या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचे सोमवारी १ जुलै २०१३ रोजी रात्री ११ वाजून ४१ मिनीटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथून एखाद्या उपग्रहाचे मध्यरात्री उड्डाण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीएसएलव्ही सी २२ एक्सएल या प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह अंतराळात सोडला गेला. एखाद्या उपग्रहाचा प्रक्षेपण कालावधी ठरवताना त्याची कक्षा व इतर बाबी लक्षात घेतल्या जातात. त्या गरजा रात्री ११.४१ या वेळेला पूर्ण होत असल्याने हे उड्डाण मध्यरात्री होणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी अगोदरच सांगितले होते. त्याप्रमाणे नियोजित वेळेनुसार आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह पीएसएलव्हीच्या एक्सएल या सुधारित प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. . इस्रोच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही २४ वी मोहीम आहे. हा उपग्रह उड्डाणानंतर अवघ्या वीस मिनिटात अवकाशात सोडला गेला. आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह १४२५ किलोचा असून त्याचा आयुष्यकाल १० वर्षे आहे.



वाहने शोधणे, आपत्ती व्यवस्थापन, प्रवासी व गिर्यारोहकांना दिशादर्शन, चालकांसाठी आवाजाची दिशा ओळखणे, सागरी दिशादर्शन, हवाई सर्वेक्षण असे या उपग्रहाचे उपयोग आहेत. सात उपग्रहांच्या आयआरएनएसएस प्रणालीत तीन भूस्थिर व चार सूर्यसापेक्ष कक्षेतील उपग्रह असतील, ते पृथ्वीपासून ३६ हजार कि.मी उंचीवर असतील.

Monday, July 1, 2013

सूर्याभोवतीच्या वातावरणाचे सर्वाधिक 'स्पष्ट चित्र'






लंडन- सूर्याच्या भोवतालच्या वातावरणाचे आतापर्यंतचे सर्वाधिक स्पष्ट छायाचित्र घेण्यात शास्त्रज्ञांना यश 
आले आहे. एका निरीक्षण उपकरणयुक्त अग्निबाणासोबत (साउंडिंग रॉकेट) पाठविलेल्या एका नव्या पद्धतीच्या कॅमेराच्या साहाय्याने छायाचित्रे काढण्यात आली आहेत. 

शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने सूर्यावर दिसणारा ठिणग्यांचा प्रकाश तथा आग आणि संबंधित काही गतिमान मार्गांचा वेध घेतला आहे. 
या संशोधकांनी 'नासा'तर्फे तयार करण्यात आलेला उच्च प्रतीचा कॅमेरा हा निरीक्षण उपकरणयुक्त अग्निबाणाच्या साहाय्याने वापरून सूर्याभोवतालच्या वातावरणाची छायाचित्रे मिळवली. 

ही छायाचित्रे व त्यातील तपशील हे आतापर्यंतच्या छायाचित्रांपेक्षा पाचपटीने अधिक स्पष्ट आहेत. पाच सेकंदाला एक प्रतिमा या वेगाने ही छायाचित्रे मिळवली आहेत. नव्या कॅमेऱ्याने नोंदवलेली निरीक्षणे ही अतिनील प्रकाशातील असून, ती सूर्यावरील चुंबकीयदृष्ट्या क्रियाशील भागावर केंद्रीत आहेत.


माहिती सौजन्यः सकाळ वृत्तसेवा

Monday, June 24, 2013

चार सूर्य असलेल्या ग्रहाचा शोध

 

 1
न्यू हेवन (कनेक्टिकट) - स्टार वॉर्स या हॉलिवुड चित्रपटांच्या मालिकांमधील आगळेवेगळे पशू, विविध प्रकारची अवकाश याने आणि विविध रंगांचे अनेक सूर्य असलेले ग्रह पाहून थक्क व्हायला होते. आता अशाच एका ग्रहाचा शोध लागला आहे. या ग्रहाला चक्क चार सूर्य आहेत. अमेरिकेच्या येल विद्यापीठातील अवकाश विज्ञानात रुची असलेल्या दोन हौशी संशोधकांनी, प्लॅनेट हंटर या संकेतस्थळाच्या माध्यमातून असा ग्रह शोधून काढला आहे. कियान जेक आणि रॉबर्ट गॅग्लिआनो अशी या संशोधकांची नावे आहेत.
 
 2
कोणत्याही ग्रहाला चंद्र असतात हे आपण नेहमी वाचतो. पृथ्वीलाही एक चंद्र आहे. गुरूला तब्बल ६३, तर शनिला ६१ चंद्र आहेत. मात्र हे सर्व चंद्र ग्रहांभोवती आणि ग्रह सूर्याभोवती फिरत असतो. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांना केवळ एकच सूर्य आहे आणि सर्व ग्रह या सूर्याभोवती फिरतात. या तरुणवैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या ग्रहाला चक्क चार सूर्य आहेत. दोन सूर्य ग्रहाच्याच कक्षेतच फिरत असतात, तर उर्वरित दोन सूर्य ग्रहाभोवती प्रदक्षिणा घाततात. या ग्रहाला पीएच-१ असे नाव देण्यात आले आहे.
 
पीएच-१ ला त्याच्या दोन सूर्यांची त्यांची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी १३८ दिवसांचा कालावधी लागतो. त्यातील एक सूर्य आपल्या सूर्यापेक्षा १.५ पट तर दुसरा ०.४१ पट मोठा आहे. ग्रहाभोवती फिरणाऱ्या सूर्यांना ग्रहाची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी २० दिवस लागतात.
 
 3
या ग्रहावरील तापमान २५१ अंश सेल्सियस ते ३४० अंश सेल्सियस असावे, असा अंदाज या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. या ग्रहावर जीवन असण्याची कोणतीही शक्यता नाही.
  
पृथ्वीपासून हा ग्रह तब्बल ५ हजार प्रकाशवर्षे दूर आहे. तो पृथ्वीहून सहापट मोठा असल्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंतच्या शोध लागलेल्या आकाशगंगांमधील ही सर्वांत लहान आकाशगंगा आहे.
 
चार सूर्य असूनही या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणावर त्यांचा कोणताच परिणाम कसा होत नाही, याचा शोध मात्र लागू शकलेला नाही. हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण असून, हौशी संशोधकांना प्रोत्साहन देण्यात यावे, अशी सूचना ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा. ख्रिस लिनटॉट यांनी केली आहे.
 
अवकाशातील चमत्कार
- प्रकाशाचा वेग - प्रति सेकंद तीन लाख किलोमीटर
- १ प्रकाश वर्ष - निर्वात पोकळीतून एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर
- स्टार वॉर्स चित्रपटांमधून टॅटूईन नावाच्या काल्पनिक ग्रहावर दोन सूर्यांचा अस्त दाखविण्यात आला होता
- नासाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार अशा ग्रहांना द्वैती ग्रह (सरकम्बायनरी) म्हणतात
- अशा प्रकारच्या अन्य सहा द्वैती ग्रहांचा यापूर्वीच शोध
- चार सूर्य असलेला आतापर्यंतच्या अवकाश संसोधनाच्या इतिहासातील पहिलाच ग्रह
1 Planet 4 Suns

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.