जुनो या उपग्रहाचा गुरुच्या कक्षेत प्रवेश









न्यूयॉर्क - गुरु ग्रहाच्या अभ्यासासाठी पाच वर्षांपूर्वी ‘नासा‘ने अवकाशात सोडलेला जुनो हा उपग्रह सोमवारी गुरु ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचला आहे. या उपग्रहाने तब्बल 1.8 अब्ज मैलाचा प्रवास पूर्ण केला आहे.

पृथ्वी व सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या जन्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षे धडपड करीत आहेत. या रहस्यांचा संबंध सूर्यमालेतील सर्वांत मोठा व प्रथम जन्मलेल्या गुरूशी असावा. त्याचमुळे शास्त्रज्ञांनी त्याच्या बुरख्याखाली काय दडले आहे हे पाहण्यासाठी ‘जुनो अवकाशमोहीम‘ आखली. दहा वर्षांच्या परिश्रमांनंतर जुनोने 5 ऑगस्ट 2011 मध्ये गुरुकडे उड्डाण घेतले होते. ही मोहीम 1.1 अब्ज डॉलर खर्चाची होती.

गुरूचा व्यास पृथ्वीच्या अकरा पट मोठा आहे. त्याच्या अंतरंगात सूर्याप्रमाणेच हायड्रोजन व हेलियम वायू आहे. यापूर्वी पायोनियर व व्हॉयेजर यानांनी गुरूला धावती भेट दिली होती. अगदी अलीकडे गॅलिलिओ नावाच्या अवकाशयानाने गुरूभोवती फिरताना त्याचे व त्याच्या चंद्रांचे निरीक्षण केले होते. मात्र या निरीक्षणातून गुरूच्या अंतर्भागाविषयी फारशी माहिती मिळू शकली नाही. याचमुळे "नासा‘च्या शास्त्रज्ञांनी 2003 मध्ये जुनो मोहीम राबविण्याचा घाट घातला. या मोहिमेमध्ये गुरूच्या जवळ जाऊन त्याच्या ध्रुव प्रदेशावरून जाताना गुरूच्या दाट वातावरणाखाली काय दडले आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. यासाठी जुनो यानामध्ये नऊ प्रकारची संयंत्रे बसविली आहेत. यामध्ये मायक्रोवेव्ह रेडिओमीटर, फ्लक्‍सगेट मॅग्नोमीटर, युव्ही-रेडिओ- प्लाझ्मांच्या वेव्ह निरीक्षणांची यंत्रे व सर्वसामान्यांच्या आकर्षणासाठी "ज्युनोकॅम‘ नावाचा कॅमेरा आहे. या सर्व यंत्रांना गुरूभोवतालच्या मोठ्या ताकदीच्या प्रारणांचा व विद्युतचुंबकीय क्षेत्राचा फटका बसू नये, म्हणून ती टिटॅनियमच्या पेटीमध्ये बसविलेली आहेत.

अवकाशयानाला ऊर्जा पुरविण्यासाठी आण्विक इंधनाऐवजी सौर ऊर्जेचा उपयोग करण्याचे ठरले. गुरू सूर्यापासून तब्बल 78 कोटी कि.मी. अंतरावर असल्याने तेथे पृथ्वीच्या 25 पट कमी सौर ऊर्जा मिळणार आहे. त्यामुळे जुनो अवकाशयानाला तीन मोठे सौर पंख बसविलेले आहेत. या सौर पंखांची रुंदी 2.7 मीटर, तर लांबी 9.1 मीटर आहे. यामध्ये 18,000 सौर बॅटऱ्या आहेत. प्रक्षेपणाच्या वेळी जुनोत पाच मीटर व्यासाचे पेलोड ठेवले होते. हे यान 20 मजली उंचीच्या व प्रचंड ताकदीच्या ऍटलस अग्निबाणाच्या साह्याने प्रक्षेपित केले होते. ऍटलसमधील पाच रॉकेट्‌सच्या साह्याने काही वेळातच ज्युनो हव्या त्या कक्षेत पोचल्यावर त्याची स्वत:भोवती फिरण्यासाठीची व सौर पंखे उघडण्याची प्रक्रिया पार पाडली गेली.

गुरूभोवती फिरताना त्याच्या तीव्र प्रारणापासून रक्षण करण्यासाठी व सौर पंख सतत सूर्यप्रकाशात राहावे म्हणून यानाला अंडाकृती कक्षेत फिरविण्याची योजना आहे. यान वर्षभरात 33 वेळा गुरूभोवती फिरणार असून, ते गुरूच्या ध्रुव प्रदेशावरून दर 11 दिवसांनी अवघ्या 5000 किलोमीटर उंचीवरून प्रवास करणार आहे. या काळात गुरूच्या प्रारणामुळे व भोवतालच्या वातावरणातील धूलिकणांमुळे यानातील सौर पंखांतील बॅटऱ्या खराब होत जाऊन यान निकामी होईल. यामुळे वर्षभरानंतर ज्युनो गुरूवर कोसळून नष्ट करण्याची योजना शास्त्रज्ञांनी आखली आहे. प्रक्षेपणापासून सव्वासहा वर्षांनी व यानाने 3.4 अब्ज किलोमीटरचा प्रवास केल्यावर त्याला निरोप देण्यात येईल. गुरूभोवती प्रदक्षिणा घालताना ज्युनो सतत स्वत:भोवती फिरत निरीक्षणे घेणार आहे. या वेळी गुरूच्या वातावरणातील पाणी, प्राणवायू व अमोनियाचे प्रमाण मोजले जाईल. या मोजमापामुळे गुरूचा जन्म कसा झाला व त्या वेळी सौर अभ्रिकेमध्ये कुठल्या भागामध्ये कुठली मूलद्रव्ये आहेत, याचा अंदाज शास्त्रज्ञांना येऊ शकेल. गुरूचे गुरुत्वाकर्षण व चुंबकीय शक्तीचे मोजमाप केले जाईल व त्यामुळे गुरूच्या केंद्रभागात घन भाग आहे काय व असल्यास तो किती मोठी असेल, याचा अंदाज बांधता येईल. गुरूच्या ध्रुव प्रदेशात दिसणाऱ्या आरोरांच्या निरीक्षणामुळे त्याच्या अंतरंगातील द्रवरूप हायड्रोजनच्या प्रमाणाचा अंदाज बांधता येईल. या सर्व निरीक्षणांच्या साह्याने गुरूचा जन्म सौर अभ्रिकेपासून कधी, कोठे व कसा झाला, याविषयीचे कोडे उलगडेल.

जुनो नाव कसे दिले
यानामध्ये ‘जुनोकॅम‘ नावाचा कॅमेरा असून, त्याने घेतलेली गुरूची छायाचित्रे "नासा‘ संगणकावर उपलब्ध करून देणार आहे. यानाचे नामकरण "जुनो‘ करण्यामागे एक कथा दडलेली आहे. गुरूची पत्नी ‘जुनो‘ हिने गुरूचा (ज्युपिटर) बुरखा फाडून त्याचे खरे रूप दाखविले, अशी दंतकथा असल्याने यानाला जुनो हे नाव दिले गेले.



जुनोची वैशिष्ट्ये

3.6 टन - उपग्रहाचे वजन

9 मीटर - सौरपॅनेलची लांबी
58 किमी/सेकंद - कक्षेत प्रवेश करतानाचा वेग
4700 किमी - अंतर जवळ जाणार

माहिती सौजन्य : सकाळ

Comments

Popular Posts