Thursday, May 19, 2016

आकर्षक शनीला पाहण्याची पर्वणी

माहिती  सौजन्य : सकाळ 

यंदाचा मे व जून महिना खगोल प्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे. खगोलप्रेमींना 9 मे रोजी बुधाचे अधिक्रमण पाहायला मिळाले. 22 मे रोजी तेजोमय मंगळ पाहण्याची संधी असून, 3 जून रोजी सूर्य मालिकेतील सर्वांत सुंदर व खगोलप्रेमींचे आकर्षण असणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. दुर्बिणीच्या साह्याने शनी पाहण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सोलापूर विज्ञान केंद्राचे संग्रहालय अभिरक्षक राहुल दास यांनी दिली. 


शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर हे 3 जून रोजी कमी असणार आहे. या वेळी शनी हा सूर्याच्या समोर असल्याने सूर्य प्रकाशामुळे नेहमीपेक्षा तो जास्त प्रकाशमान दिसणार आहे. शनीच्या भोवती असणारे कडे हे त्याला इतर ग्रहांपेक्षा वेगळे ठरविते. यादिवशी हे कडे देखील दुर्बिणीच्या माध्यमातून दिसणार आहे. 3 जून रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी शनी सूर्याच्या समोर येणार आहे. त्या दिवशी सायंकाळी 6 पासून 4 जूनच्या पहाटेपर्यंत शनीचे निरीक्षण करणे शक्‍य होणार आहे. तीन जूननंतर सुमारे 378 दिवसांनी हा नजारा पुन्हा पाहावयास मिळेल. 

तीन जूनला पूर्वेकडे सायंकाळी अवकाशामध्ये मंगळ, शनी, ज्येष्ठा तारा यांचा त्रिकोण होणार आहेत. हा त्रिकोण रात्री साध्या डोळ्यांनीसुद्धा पाहता येणार आहे. एकावेळी ते आकाशात दिसणार असून, या वेळी मंगळ जास्त प्रकाशमान दिसेल यानंतर शनी व ज्येष्ठा तारा प्रकाशमान दिसतील.

No comments: