Wednesday, May 6, 2015

"नासा" संस्थेचे मंगळ मोहिमेसाठी कल्पना सुचविण्याचे आवाहन

 

वॉशिंग्टन - नासाच्या महत्वाकांक्षी मंगळमोहिमदरम्यान मंगळावर दीर्घकाळ राहणाऱ्या मानवाच्या वास्तव्याबाबत नासाने खुले स्पर्धात्मक आवाहन करण्यात आले असून त्यासाठी कल्पना मागविण्यात येत आहेत. 

नासा मंगळावर मानवी वस्ती उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. हा प्रकल्प आव्हानात्मक असून अंतराळवीरांना निरनिराळ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या प्रकल्पादरम्यान अंतराळामध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींसाठी विविध कल्पना मागविण्यात येत आहेत. त्यामध्ये वास्तव्य, अन्न, पाणी, श्‍वासोच्छवासासाठी प्राणवायू, संपर्क यंत्रणा, व्यायाम तसेच औषधोपचरांबाबत कल्पना मागविण्यात आल्या आहेत. "यामध्ये सहभागी होणाऱ्यांना या उदाहरणांच्या पलिकडे काही कल्पक आणि नाविन्यपूर्ण घटकांबाबत विचार करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे‘ असे नासाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विजेत्याला पाच हजार डॉलरचे बक्षिस दिले जाणार आहे. तसेच पुरस्कारांची एकूण रक्कम 15 हजार डॉलर्स आहे. सहभागींना मंगळाच्या पृष्ठभागाच्या क्षमता आणि कार्यपद्धतीचा विचार करून पृथ्वीवरील कमीत कमी मदतीशिवाय मोहिम यशस्वी करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समर्पकता, कल्पकता, साधेपणा, संसाधनांची कार्यक्षमता, व्यवहार्यता, सर्वसमावेशकता या बाबींच्या आधारे यशस्वी सहभागीची निवड करण्यात येणार आहे.

पुढील दुव्यावरुन नासाच्या या उपक्रमाची माहिती मिळेल. तसेच पारितोषिक किती व कसे असेल याचीही माहिती मिळेल. : http://www.nasa.gov/solve/marsbalancechallenge 



माहिती स्त्रोतः नासा वेबसाईट व ईसकाळ.कॉम

Wednesday, January 28, 2015

माहिती असलेल्या विश्‍वातील सर्वांत जुन्या सूर्यमालिकेचा शोध


वॉशिंग्टन - खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकास अमेरिकेच्या केपलर या दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेत असताना विश्‍वामधील सर्वांत जुनी सूर्यमालिका शोधण्यात यश आले आहे. या सूर्यमालिकेमध्ये एकूण पाच ग्रह आढळले असून, ही सूर्यमालिका विश्‍वाच्या जन्माच्या वेळेनंतर काहीच कालावधीमध्ये निर्माण झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

या सूर्यमालिकेमधील मुख्य तारा केपलर ४४४ हा आहे. केपलर हा सूर्यासारखाच तारा असून तो सुमारे ११.२  अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. या काळामध्ये विश्‍वाचे वय आत्तापेक्षा २० टक्‍क्‍यांनी कमी होते, असे या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या संशोधनामध्ये स्पष्ट केले आहे. पृथ्वी असलेल्या आपल्या सूर्यमालिकेचे वय "केवळ‘ ४.५ अब्ज वर्षे आहे!



"या संशोधनामुळे विश्‍वाच्या १३.८  अब्ज वर्षांच्या इतिहासामध्ये पृथ्वीसारखे ग्रह अनेक निर्माण झाले असल्याच्या शक्‍यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या ग्रहांवर पुरातन जीवव्यवस्था असण्याची शक्‍यता आहे,‘‘ असे या संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व बर्मिंगहॅम विद्यापीठाने केले होते. या पथकामध्ये डेन्मार्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, जर्मनी व इटलीच्या संशोधकांचा समावेश होता.

केपलर ४४४ हा तारा सूर्यापेक्षा सुमारे २५ टक्‍क्‍यांनी लहान असून, ही सूर्यमालिका पृथ्वीपासून ११७ प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालिकेमधील पाचही ग्रहांचे क्षेत्रफळ पृथ्वीपेक्षा कमी आहे. या सूर्यमालिकेमधील सर्व ग्रह दहा दिवसांपेक्षाही कमी दिवसांत केपलर ४४४ ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतात. या नव्या संशोधनामुळे प्राचीन ग्रहांच्या निर्मितीसंदर्भातील बहुमोल माहिती हाती लागण्याची शक्‍यता आहे.

मंगळावर स्थलांतर

  मंगळावर स्थलांतर :   आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्...