Thursday, January 17, 2019

भारतातून सोमवारी सुपरमूनचे दर्शन
सोमवार, २१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या वेळी ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमूनचे दर्शनही होणार आहे. खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लडमूनचे दर्शन भारतातून होणार नाही; परंतु त्या रात्री सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
पौष पौर्णिमेला, सोमवारी सकाळी ९ वाजून ४ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे; परंतु या वेळी चंद्रबिंब आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. हे खग्रास चंद्रग्रहण मध्य पूर्व देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ओसेनिआ आणि रशियाचा पूर्वभाग येथून दिसणार आहे. या ठिकाणाहून ब्लडमून, सुपरमून आणि वुल्फमून यांचे दर्शन होणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला, तर चंद्रबिंब आकाराने १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. या चंद्राला 'सूपरमून' म्हणतात. या वेळी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख, ५७ हजार, ३४२ किमी. अंतरावर येणार आहे. नव्या वर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला 'वुल्फमून' असे म्हणतात. 

भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार नसले तरी 'सुपरमून'चे दर्शन आपल्याला होणार आहे. २१ जानेवारीला चंद्र सायंकाळी ६.३९ वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१२ वाजता मावळेल. त्या रात्री सुपरमून म्हणजे मोठे आणि जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनीही पाहता येईल. भारतातून दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण १६ जुलैला होणार आहे. तसेच, सुपरमून दिसण्याचा योग पुन्हा याचवर्षी माघ पौर्णिमेच्या रात्री १९ फेब्रुवारीला येणार असल्याचेही सोमण यांनी सांगितले. 


सुपरमून म्हणजे नेमके काय ? हा फरक पुढिल छायाचित्रावरुन स्पष्ट व्हावा.माहिती सौजन्य  : www.esakal.com


छायाचित्रे : आन्तरजालावरुन साभार