Tuesday, April 26, 2011

१ मे २००११, रविवार या दिवशी आकाशात ग्रहांची पार्टी


येत्या १ मे २००११, रविवार या दिवशी  आकाशात ग्रहांची पार्टी होणार आहे.

नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे आणि दुर्बिणीतून दिसू शकणारे असे दोन्ही प्रकारचे सर्व ग्रह सलगतेने एका छोट्या कालावधीत चंद्राबरोबर पाहता येतील. फक्त शनि हा विरुद्ध बाजूला असल्यामुळे सर्व ग्रहांच्या बरोबर नसेन.

ही एक अत्भुत आणि अद्वितीय अशी खगोलीय घटना आहे. सर्व ग्रह एकत्र येण्यासाठी खूप मोठा असा कित्येक वर्षांचा कालावधी जावा लागतो. सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मधे असलेले ग्रह आणि पृथ्वीच्या पलिकडच्या कक्षेत असलेला मंगळ हा ग्रह देखील सूर्याभोवती वेगात फेर्‍या मारतात त्यामुळे हे ग्रह लवकर एकत्र  येतात.
पण तुलनेने जास्त लांब असलेले ग्रह गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे सर्व ग्रह एक सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक वर्षे घेतात. हे लक्षात घेतले म्हणजे  ही खगोलीय घटना किती दुर्मिळ आहे हे लक्षात येईल.

आता आकाशात कोणकोणते ग्रह १ मे २०११ या दिवशी दिसणार आहेत आणि कोणत्या वेळी ते पाहूयात.
या दिवशी सूर्योदयाच्या थोडे आधी पहाटे आकाश काळे असताना हा सुंदर देखावा दिसण्यास सुरुवात होईन.  जवळपास एका रेषेत असलेले हे सर्व ग्रह शोधायला फारसे कष्ट पडणार नाहीत.

ख-मध्यापासून (म्हणजे आकाशाच्या मध्यापासून)  ते पूर्व क्षितिजाकडे एक नजर टाकली की त्या दिशेत चंद्र आणि एकूण ८ ग्रह एका-मागोमाग असे दृष्टीस पडतील. यांच्यातही गुरु आणि मंगळ एकत्र जोडीच्या स्वरुपात दिसतील तर दुसरी जोडी नजरेस पडेल ती बुध आणि शुक्र या ग्रहांची.

ही माहिती झाली नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या ग्रहांबद्दल. आता  द्विनेत्री (बायनॉक्युलर) च्या  साहाय्याने पाहता येणार्‍या ग्रहांबद्दल पाहूयात. एखादी छोटी दुर्बिण असेन तर फार उत्तम. प्लुटो , नेपच्युन आणि युरेनस हे ग्रह सर्वप्रथम उगवतील व आकाशाच्या मध्यापासून ते दिसू शकतील.

१ मे ला सहस्त्ररश्मि सूर्य आगमन करायच्या आधी काही तासांपासूनच हे सर्व ग्रह एकामागोमाग एक उगवायला सुरुवात करतील.
कसे ते क्रमाने पाहूयात.

- प्लुटो ३० एप्रिल च्या रात्रीच १० वाजून ५६ मिनिटांनी पूर्व क्षितिजावर उगवेल.
- त्यानंतर १ मे च्या भल्या पहाटे २ वाजून २० मिनिटांनी नेपच्युन उगवेल
- मग युरेनसचे आगमन होईल ते ३ वाजून ५३ मिनिटांनी
- एरव्ही आकाशातील राजा असलेला पण अमावस्येच्या छायेत येत असल्यामुळे क्षीण झालेला चंद्रमा उगवेल तो पहाटे ४ वाजून ८ मिनिटांनी.
- शुक्र ४ वाजून २२ मिनिटांनी  उगवेल
- आणि पाठोपाठ बुध ग्रह ४ वाजून ३५ मिनिटांनी अवतरेल.
- मंगळ ग्रहाचे दर्शन पूर्व क्षितिजावर घडेल ते  ४ वाजून ४७ मिनिटांनी
- आणि सर्वात शेवटी ग्रहांचा राजा गुरु चे आगमन होईल ते ४ वाजून ४९ मिनिटांनी.

पुढील चित्रावरुन आकाशात ग्रहांची गर्दी कशी होणार आहे याची थोडी फार कल्पना येईन.
चित्र : मायाजालावरुन  घेतले आहे. संदर्भ दुवा


From Khagol


हा नयनरम्य देखावा डोळ्यांत साठवून  ठेवण्यासाठी पहाटे ५ वाजताची वेळ योग्य आहे.
तेव्हा पहाटे ४.५५ चा गजर लावून ३० एप्रिलच्या रात्री लवकर झोपा  आणि पहाटे पाच वाजता आकाशात होणार्‍या ग्रहांच्या पार्टीला हजर रहायचे विसरु नका :)
या दिवशी सूर्योदयाची वेळ जवळपास सकाळी ६ वाजता आहे. तरीही  १ तास आधीच हा अत्भुत देखावा नजरेस पडणार असल्यामुळे आकाश निरिक्षणाची  आवड असलेल्या सर्व खगोलप्रेमींची निराशा अजिबात होणार नाही. पूर्वेच्या अर्ध्या आकाशात नुसती नजर फिरवली तरी हे सर्व ग्रह पाहता येतील.


साडेपाच वाजता आकाश साधारणतः असे दिसेन.
अर्थात सर्व ग्रहांची एकत्रित स्थिती आभासी असली तरी प्रत्यक्षात हे सर्व ग्रह करोडो मैल अंतरावर आहेत. या खगोलीय घटनेचा पृथ्वीवर कोणताही अनिष्ट परिणाम अपेक्षित नाही.
ग्रहांचा राजा गुरु आणि इतर ग्रह तुलनेने जवळ येणार असल्यामुळे सर्व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचे एकत्रिकरण होऊन सूर्याला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होईनच. त्यातून निर्माण झालेल्या चुंबकीय शक्तीमुळे कदाचित सौरलाटा निर्माण होऊ शकतात. होतीलच असे नाही. पण ही एक शक्यता नाकारता येत नाही. सूर्यावर लाटा उसळणे ही सामान्य बाब असली तरी  तुलनेने मोठ्या आकाराच्या लाटा पृथ्वीच्या उपग्रहांद्वारे होणार्‍या दळणवळणात अडथळा आणु शकतात.  ही शक्यता असली तरी एकंदरीत त्या दिवशी काही होईल असे मला वाटत नाही.

खगोलप्रेमींनी या दुर्लभ घटनेचा लाभ घ्यावा व त्याची माहिती व्हावी  एवढेच या लेखाचे प्रयोजन.
१ मे २०११ या दिवशी सर्व आकाशनिरिक्षकांना  आकाश मोकळे मिळो व ग्रहांच्या  पार्टीत मौजमजा करायची संधी मिळो अशी मनापासूनची इच्छा :)

धन्यवाद,
~सागर

2 comments:

Mandar said...

धन्यवाद सागर, खूपच उत्तम माहिती दिली अहे..
हा एक खरंच दुर्मिळ योग आहे...नक्कीच बघणार..
माझ्याकडॆ skymap आणि cybersky आहे.त्यातून Preview छान दिसतोय.

गंमत पहा..आपल्या जन्मापासूनच आपला राशी ग्रह इ. शी संबंध यायला सुरूवात होते.
कारण
1) जन्मल्या बरोबर आपली पत्रिका बनवली जाते.
2) आपल्या समाजात लोक व्यवहारातील कित्येक गोष्टी कुंडली, मुहूर्त इ. पाहून करतात.
3) लग्न जमवताना हमखास पत्रिका पाहिली जाते.
4)पत्रिकेत मंगळ आहे म्हणून लग्न जमत नाहीत.
5) शुक्राचा अस्त म्हणून लग्नाचे मुहूर्तच नसतात.
6) अनेक जण साडेसाती आहे म्हणुन शनीची पूजा वगैरे करतात, शनिशिंगणापूरला जातात.
7) दर महिन्याला संकष्टीला चंद्रोदय झाला की लोक उपवास सोडतात (कॅलेंडरमध्ये चंद्रोदयाची वेळ पाहून).
8)पाडवा, दसरा, दिवाळी, रक्षाबंधन असे कितीतरी सण तिथींवर ठरतात आणि त्यांचे शुभकाल वगैरे दिलेले असतात. म्हणजे इथे पुन्हा चंद्र आलाच.
9)अमुक नि तमुक ग्रहाची शांती वगैरे प्रकार केले जातात.
10)शुक्र तारा मंद वारा, उगवली शुक्राची चांदणी अशी गाणी लोकप्रिय होतात.
11)पावसाळा सुरू झाला की मृगाचा पाऊस हा शब्द वाचनात येतोच.

थोडक्यात काय तर दैनंदिन जीवनातील बऱ्याचशा गोष्टींशी आकाशातील ग्रह,तारे आणि चंद्राचा संबंध येतो. पण चंद्र सोडल्यास सहसा आपण अन्य ग्रहांकडे फारसे लक्ष देत नाही.

यातील श्रद्धा-अंधश्रद्धा/धार्मिक रीतिरिवाज हा भाग व्यक्तीसापेक्ष आहे. पण अशा प्रकारे आपल्या जीवनाला व्यापून राहिलेले हे ग्रह प्रत्यक्षात कसे दिसतात हे किमान Astronomical Point of view ने पाहण्याची ही उत्तम संधी आपण सोडू नये ही विनंती (अर्थात आकाश निरभ्र असेल तरच!)
धन्यवाद !
-मंदार

सागर भंडारे said...

अगदी खरे आहे मंदार,

आपल्या दैनंदीन गोष्टीत असणारे ग्रहांचे महत्त्व लोक आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विसरत चालले आहेत.
तुला आकाश निरभ्र मिळो आणि ग्रहांच्या पार्टीचे अवलोकन करण्याचे भाग्य लाभो ही मनापासूनची प्रार्थना.
इकडे बंगळूरात सध्या खूप ढगाळ हवामान आहे त्यामुळे मला हा नयनरम्य देखावा पहावयास मिळेल की नाही हे १ मे लाच कळेन :)

Skymap आणि Cybersky या दोन्ही सॉफ्टवेअर्सच्या माहिती बद्दल मनापासून धन्यवाद.
यातले Cybersky चे ट्रायल उतरवून घेतले आहे. बघतोच आहे कसे आहे ते :)
एकंदरीत झकास दिसते आहे Cybersky