वॉशिंग्टन - खगोलशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय पथकास अमेरिकेच्या केपलर या दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घेत असताना विश्वामधील सर्वांत जुनी सूर्यमालिका शोधण्यात यश आले आहे. या सूर्यमालिकेमध्ये एकूण पाच ग्रह आढळले असून, ही सूर्यमालिका विश्वाच्या जन्माच्या वेळेनंतर काहीच कालावधीमध्ये निर्माण झाल्याचे संशोधकांनी सांगितले.
या सूर्यमालिकेमधील मुख्य तारा केपलर ४४४ हा आहे. केपलर हा सूर्यासारखाच तारा असून तो सुमारे ११.२ अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे. या काळामध्ये विश्वाचे वय आत्तापेक्षा २० टक्क्यांनी कमी होते, असे या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या संशोधनामध्ये स्पष्ट केले आहे. पृथ्वी असलेल्या आपल्या सूर्यमालिकेचे वय "केवळ‘ ४.५ अब्ज वर्षे आहे!
"या संशोधनामुळे विश्वाच्या १३.८ अब्ज वर्षांच्या इतिहासामध्ये पृथ्वीसारखे ग्रह अनेक निर्माण झाले असल्याच्या शक्यतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या ग्रहांवर पुरातन जीवव्यवस्था असण्याची शक्यता आहे,‘‘ असे या संशोधकांनी म्हटले आहे. संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय पथकाचे नेतृत्व बर्मिंगहॅम विद्यापीठाने केले होते. या पथकामध्ये डेन्मार्क, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, जर्मनी व इटलीच्या संशोधकांचा समावेश होता.
केपलर ४४४ हा तारा सूर्यापेक्षा सुमारे २५ टक्क्यांनी लहान असून, ही सूर्यमालिका पृथ्वीपासून ११७ प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालिकेमधील पाचही ग्रहांचे क्षेत्रफळ पृथ्वीपेक्षा कमी आहे. या सूर्यमालिकेमधील सर्व ग्रह दहा दिवसांपेक्षाही कमी दिवसांत केपलर ४४४ ताऱ्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतात. या नव्या संशोधनामुळे प्राचीन ग्रहांच्या निर्मितीसंदर्भातील बहुमोल माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.
1 comment:
nice Blog ....
Submit your blog in our blog directory for more visitors
www.blogdhamal.com
Post a Comment