Wednesday, September 14, 2011

पिन-व्हील आकाशगंगेत झालाय सुपरनोव्हाचा विस्फोट

एम-१०१ उर्फ पिन-व्हील या नावाने ओळखल्या जाणार्‍या सर्पिलाकार आकाशगंगेत गेल्या महिन्यात म्हणजे २३ ऑगस्ट २०११ या दिवशी एक खूप मोठा सुपरनोव्हाचा विस्फोट झाल्याचा शोध लागला.
हीच ती पिन-व्हील आकाशगंगा :
From Khagol

आज संध्याकाळपासून म्हणजे १४ सप्टेंबर २०११ पासून या सुपरनोव्हाची चमक ही सर्वात जास्त राहीन. किमान पुढील एक महिना तरी हे विहंगम दृष्य आकाशात एका छोट्याश्या दुर्बिणीच्या साहाय्याने पाहता येईल.


ध्रुव तार्‍याकडे दिशानिर्देश करणार्‍या सप्तर्षि तारकासमूहाच्या शेवटच्या तीन तार्‍यांच्या खालच्या बाजूला या सुपरनोव्हाचे दर्शन घडेल.
पुढील २ नकाशांवरुन सुपरनोव्हाचे ठिकाण आकाशात सहज शोधता येईल.
नकाशा क्र. १:
From Khagol

नकाशा क्र. २
From Khagol


आणि या नकाशावरुन पिन-व्हील आकाशगंगेतील सुपरनोव्हाची नक्की जागा कळू शकेल.

या अत्भुत खगोलीय घटनेची अजून माहिती घेण्याअगोदर आपण "सुपरनोव्हा म्हणजे काय? " हे थोडक्यात पाहूयात.
सुपरनोव्हाची गळाभेट घेण्या अगोदर आधी 'नोव्हा'च्या दारात थोडी पायधूळ झाडूयात.
नोव्हा बहुतांशी दोन तार्‍यांच्या धुमश्चक्रीतून निर्माण होतो. जेव्हा एखादा श्वेत बटू तारा (ज्याची घनता जास्त असते) त्याच्या जवळ असणार्‍या (आयुष्य संपत आलेल्या) राक्षसी तार्‍यातील द्रव्य (हेलियम वायू) मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचून घेतो त्यावेळी हेलियम आणि हायड्रोजन या दोन वायुंच्या संयोगामुळे प्रचंड मोठे स्फोट होतात, या विस्फोटांमुळे तार्‍याची तेजस्विता कितेक पटींने वाढते व हे स्फोट दुर्बिणीतून आपल्याला दिसतात. अर्थात यांचे प्रमाण मर्यादीत असते म्हणून या स्फोटाला नोव्हा म्हणतात

आता सुपरनोव्हाकडे वळूयात.
आकाशातील एखाद्या विशाल ताऱ्याचा स्फोट होतो आणि तो प्रज्वलित होऊन आकाशात बराच काळ दिसतो , ताऱ्यांच्या या स्थितीला सुपरनोव्हा असे म्हणतात .
आपल्या मिल्की वे या आकाशगंगेतील केपलर सुपरनोव्हाचा स्फोट सुप्रसिद्ध आहे. पुढील छायाचित्रावरुन या केपलर सुपरनोव्हाच्या सौंदर्याची भुरळ पडू लागली तरी हे विहंगम दिसत असलेले दृश्य एका महाविस्फोटाचे आहे हे कृपया वाचकांनी लक्षात घ्यावे.
आता आजपासून एक महिनाभर अवकाशात दिसणार्‍या या अत्भुत खगोलीय घटनेची माहिती घेऊयात.
पिन-व्हील (एम-१०१) या आकाशगंगेत झालेल्या या विस्फोटाची पहिली माहिती २३ ऑगस्ट २०११ लाच मिळाली होती. हळू हळू या सुपरनोव्हाची चमक वाढते आहे आणि आज रात्री किंवा उद्या (गुरुवारी) रात्री याची चमक उच्चतम असेल. साधारण महिनाभर आकाशात हे रोमांचक दृश्य पहावयास मिळेल. त्यानंतर मात्र ही चमक हळू हळू कमी होईल. वैज्ञानिकांना या सुपरनोव्हाच्या स्फोटाचे अगदी सुरुवातीचे काही क्षण पहावयास मिळाले आहेत, आणि ही अतिशय दुर्मिळ स्थिती असते. बर्‍याच वेळा स्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी या घटनांचा शोध लागतो. गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात जवळ असलेला आणि सर्वात चमकदार असा सुपरनोव्हाचा विस्फोट आहे. या सुपरनोव्हाचे नामकरण "एस.एन.२०११-एफ.ई." असे ठेवण्यात आले आहे. आपल्यापासून साधारणपणे २.१ कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या या सर्पिलाकार आकाशगंगेचे अंतर इतर आकाशगंगांच्या तुलनेने जवळ आहे.

आतापर्यंत संपूर्ण मानवजातीच्या ज्ञात इतिहासात केवळ ४ सुपरनोव्हाचे स्फोट झाल्याची माहिती आहे, यावरुन ह्या खगोलीय घटनेचे महत्त्व लक्षात यावे. हे सर्व चारही स्फोट आपल्याच आकाशगंगेत झालेले होते.
पहिला स्फोट १००६ साली,
दुसरा १०५४ साली,
तिसरा १५७२ साली आणि
चौथा १६०४ साली
असे सर्वात चमकदार चार सुपरनोव्हाचे स्फोट ज्ञात आहेत.

कोणत्याही प्लॅनेटोरियममध्ये जाऊन हे सुंदर दृश्य तुम्हाला बघता येईल. पुढील महिनाभरच दिसणारे हे सुंदर दृश्य कदाचित तुमच्या पुढच्या आयुष्यात बघावयास मिळण्याची शक्यताही नाहीये. तेव्हा ही संधी चुकवू नका आणि या अत्भुत खगोलीय घटनेचा - सुपरनोव्हाचा स्फोट - अवश्य पहा.

No comments:

मंगळावर स्थलांतर

  मंगळावर स्थलांतर :   आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्...