Sunday, April 2, 2017

गुरूची 7 एप्रिलला प्रतियुती गुरू येणार पृथ्वीजवळ






अमरावती : सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा 7 एप्रिलला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. 'ज्युपिटर अॅट अपोझिशन' या दिवशी गुरू व सूर्य समोरासमोर राहील. प्रतियुती काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासक व जिज्ञासूंना गुरूचे निरीक्षण व अभ्यासाची ही एक चांगली संधी असते.
गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. याआधी मंगळवार, 8 मार्च 2016 रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झालेली होती. पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर 93 कोटी किलोमीटर आहे. त्याचा व्यास 1 लाख 42 हजार 800 किलोमीटर आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास 11.86 वर्षे लागतात. गुरूला एकूण 67 चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता त्याच्यावरील पट्टा व 4 चंद्र दिसतात. 7 डिसेंबर 1995 रोजी मानवरहित यान गॅलिलिओ गुरूवर पोचले होते; मात्र गुरूवर सजीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.
पृथ्वीपेक्षा गुरू हा 11.25 पट मोठा आहे. आरक्‍त ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रेट रेड स्पॉट या नावाने हा ठिपका ओळखला जातो. हा ठिपका 40 हजार किलोमीटर लांब आणि 14 हजार किलोमीटर रुंद अशा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्‍यात पृथ्वीसारखे 3 ग्रह एकापुढे एक ठेवता येतील. न्यूटनकाळापासून म्हणजे जवळजवळ 300 वर्षे हा ठिपका खगोल शास्त्रज्ञ पाहत आलेले आहेत. या ठिपक्‍याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर सतत घोंगावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात आहे.
उघड्या डोळ्यांनी पाहता येणार
7 एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू हा पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्‍चिमेस मावळेल. हा ग्रह अतिशय तेजस्वी असल्याने सहज ओळखता येईल व साध्या डोळ्यांनीही पाहता येईल; परंतु गुरूवरील ग्रेट रेड स्पॉट व युरोपा, गॅनिमिड आयो व कॅलेस्टो हे त्याचे चार चंद्र साध्या डोळ्यांनी दिसू शकणारे नाहीत. त्यासाठी टेलिस्कोपची आवश्‍यकता आहे, अशी महिती मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर व प्रवीण गुल्हाने यांनी दिली.

No comments:

मंगळावर स्थलांतर

  मंगळावर स्थलांतर :   आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्...