मंगळावर स्थलांतर:
आपल्या सर्वांना माहिती आहे कि स्पेस एक्स कंपनीचे प्रमुख एलोन मस्क हे मंगळावर मानवाची वस्ती निर्माण करणे या एकाच ध्येयासाठी काम करत आहेत.
२०५० सालापर्यंत १० लाख लोकांची वस्ती मंगळ ग्रहावर वसविण्याचे स्वप्न त्यांचे आहे. अगदी १० लाख नाही पण किमान मंगळ हा ग्रह मनुष्यासाठी राहण्यायोग्य होईल आणि काही हजार लोक तिथे स्थायिक होतील अशी आशा करूयात.
मंगळावर मानवाचे हे स्थलांतर का केले जात आहे ? याची गरज काय आहे ? हे स्वप्न कसे प्रत्यक्षात येईल ? यात सर्वांना संधी असेल काय ? राजकीय हेतू काय असतील ? कोण कोणते देश यात सहभागी असतील ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला भविष्यकाळात मिळतीलच पण तरीही यातल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण या लेखाद्वारे प्रयत्न करणार आहोत. पण त्या आधी मंगळ ग्रह आणि तेथे मानवाचे वास्तव्य करण्या संदर्भात जी माहिती उपलब्ध आहे आणि स्पेस एक्स चे प्रमुख एलोन मस्क जे काम करत आहेत त्याचा आढावा घेणे आवश्यक आहे.
मंगळावर मानवाला स्थलांतर करण्याची गरज का आहे हे आधी पाहुयात. आपल्या सूर्यमालेत हॅबिटॅबल झोन मध्ये केवळ दोनच ग्रह येतात एक म्हणजे पृथ्वी आणि दुसरा ग्रह म्हणजे मंगळ. हॅबिटेबल झोन म्हणजे ताऱ्यापासूनचे असे क्षेत्र कि ज्या अंतरावर सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी पुरेसे सुरक्षित वातावरण आणि परिस्थिती उपलब्ध आहे.
एक वेळ भविष्यात अशी नक्की येणार आहे की ग्रीन हाऊस इफेक्ट मुळे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात आज उपलब्ध असलेले द्रव पाणी राहणार नाही. आणखी द्रव पाणी नाही म्हणजे आणखी जीवन नाही. म्हणूनच आपल्याला पृथ्वीवरील सजीव प्रजाती जिवंत ठेवण्यासाठी हॅबिटेबल झोन मधील दुसर्या ग्रहावर स्थलांतरित होणे भाग आहे. आणि हीच मंगळावर स्थलांतर या मोहिमेची गरज आहे.
मार्स उर्फ मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सर्वसाधारणपणे १४ कोटी मैल अर्थात २२.५ कोटी किलोमीटर दूर अंतरावर आहे. पृथ्वीपासून मंगळ या ग्रहावर यात्रा करण्यासाठी कमीत कमी ८ महिने लागतात. आणि ही यात्रा २६ महिन्यांतून केवळ एकदाच करता येऊ शकते. मंगळ ग्रहाचे आपल्यापासूनचे किमान अंतर केवळ ३.३९ कोटी मैल अर्थात ५.४५ कोटी किलोमीटर एवढे कमी असते आणि अधिकतम (कमाल) अंतर २५ कोटी मैल अर्थात ४० कोटी किलोमीटरपेक्षा जास्त असते. याचे प्रमुख कारण आपली पृथ्वी सूर्याभोवती जवळपास गोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरते, तर त्या तुलनेत मंगळ ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार आहे. म्हणूनच आपल्याला मंगळावर जाण्यासाठी २६ महिन्यांतून एकदा मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ येण्याची वाट बघावी लागते.
यासाठी स्पेस एक्स ने खास तयार केलेले अत्याधुनिक रॉकेट स्टारशिप चा वापर करावा लागेल हे उघड आहे. स्पेस एक्स ने फाल्कन अग्निबाणाच्या शेकडो चाचण्या घेतल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचल्या असतीलच. भविष्यकाळात दुसऱ्या ग्रहावर मनुष्यवस्ती निर्माण करण्यासाठी आपण आता सज्ज आहोत. तर २०१८ पासून या स्टारशिप रॉकेट चे निर्माण सुरु आहे आणि अनेक वेळा या रॉकेट चा वापर पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी या परतीच्या प्रवासासाठी होणार आहे. अनेकवेळा प्रवास करण्याची क्षमता बाळगून असणाऱ्या या स्टारशिप रॉकेट चे २ भाग आहेत. यातला १ भाग सुपर हेवी बुस्टर आहे. जो पृथ्वीच्या तीव्र गुरुत्वाकर्षण शक्तीशी संघर्ष करून रॉकेटला अवकाशात नेऊन स्थापित करेन. त्यानंतर हा बुस्टर वेगळा केला जाईल आणि त्याच्या जागी दुसरा बूस्टर मंगळ ग्रहाच्या प्रवासासाठी या रॉकेटला लावला जाईल.
स्पेस एक्स नेतृत्व करत असलेल्या मंगळावर स्थलांतर मोहिमेचे काही ठळक टप्पे असे आहेत:
एप्रिल २०२५ : ५ स्टारशिप रॉकेट्स मार्स वर उतरविण्याची स्पेस एक्स ची योजना आहे. हे रॉकेट्स उतरल्याबरोबर ७ फुटबॉल मैदानाच्या आकारा एवढ्या क्षेत्रात मंगळावर सोलर पॅनेल्स चे जाळे उभारले जाईल. त्यासाठी रोबोट्स आणि स्वयंचलित वाहने वापरून मंगळावरची जमीन ही सपाट करून तयार ठेवली जाईल. म्हणजे भविष्यकाळात जेवढे रॉकेट्स मार्स वर येतील, त्यांना अडचण होणार नाही.
जून २०२७ : २ स्टारशिप रॉकेट्स मंगळावर उतरतील तेव्हा मंगळाची लोकसंख्या ३० होईल.
थोडक्यात या २ स्पेस शिप्स मधून ३० मानव मंगळ ग्रहावर वास्तव्यासाठी येणार आहेत. त्यांच्या मागोमाग अजून १० स्टारशिप रॉकेट्स असतील ज्यात या ३० लोकांच्या उपयोगाचे सर्व सामान असेल. या सामानापैकी मुख्य भाग अर्थातच या ३० लोकांच्या जेवणाचा असणार आहे. जेणेकरून त्यांना दीर्घ काळ मंगळावर वास्तव्य करता येईल.
या ३० लोकांत डॉक्टर्स , वैज्ञानिक, इंजिनिर्स आणि काही सैन्यातील लोक असतील. पृथ्वीच्या तुलनेत मंगळावर असलेले गुरुत्वाकर्षण ७०% कमी आहे. त्यामुळे या सर्व ३० लोकांना (कमी गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेल्या) मंगळावरील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ तर लागेलच. पण याचा दुसरा फायदा हा आहे की पृथ्वीवरून मंगळावर आणलेले जड सामान एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहून नेणे सोपेही होणार आहे.
या चमूतील काही वैज्ञानिक लगोलग मिथेन गॅस ची निर्मिती सुरु करण्यासाठी काम सुरु करतील. ज्यामुळे स्टारशिप रॉकेट्स मधील इंधनाच्या टाक्या ते पुन्हा भरू शकतील. आणि ही रॉकेट्स अवकाशात पुन्हा झेप घेऊन पृथ्वीच्या दिशेने प्रवास करू शकतील.
तर काही जैव शास्रज्ञ पृथ्वीवरून आणलेल्या काही रोपटयांना मंगळावरच्या लाल मातीत वाढवण्याचा प्रयोग सुरु करतील. ज्यात टोमॅटो , बीन्स, मुळा, गाजर , बटाटा यासारखी जवळपास कोणत्याही वातावरणात वाढणारी कंदमुळे किंवा भाज्या प्रामुख्याने असतील. यांचा उपयोग मंगळावर खाण्यासाठी देखील पुढे केला जाणार आहे. २०१५ साली मंगळावरील वास्तव्याचा वेध घेणारा एक सुंदर चित्रपट आला होता "The Martian". या चित्रपटात दाखवल्या प्रमाणेच जवळपास भाज्या आणि रोपटी मंगळावर वाढवली जाणार आहेत. उतरलेल्या चमूच्या सदस्यांची विष्ठा गोळा करून ते खत म्हणून वापरून या भाज्या आणि कंदमुळे उगवली जाणार आहेत.
जुलै २०२९: मंगळावरची लोकसंख्या आता ७६ ने वाढलेली असेल.
या प्रवासात देखील अतिशय कुशल बॉटॅनिस्ट, वैज्ञानिक, इंजिनिर्स इत्यादींना आणले जाईल. पण या हा चमू एका गोष्टीसाठी खास असेल. कारण पहिल्यांदा ४ सामान्य माणसे देखील या चमूसोबत आलेले असतील. अर्थात हे ४ लोक तिकीट विकत घेऊन आलेले असणार आहेत. आता मंगळाची एकूण लोकसंख्या ३०+७६ म्हणजेच १०६ झालेली असेन. मानवासाठी निर्मित वस्तीमध्ये ग्रीन हाऊस तयार केले जातील जेणे करून सूर्यप्रकाशाचा वापर करून भाज्या पिकवणे सोपे होईल. आणि मंगळावरील सर्व रहिवाश्यांसाठी तिथेच अन्नाची सोय केली जाईल.
ऑगस्ट २०३१: मंगळावरची लोकसंख्या आता १६६ झालेली असेल.
मंगळावर आता खोदकाम सुरु झालेले असेन. या खोदकामाचे प्रमुख मिशन हे आहे की मंगळावरील जमिनी खाली मानवासाठी सुरक्षित वसाहत निर्माण करता येते का हे बघणे आहे. एलोन मस्क ची बोअरिंग कंपनी यासाठी अनेक वर्षांपासून तयारी करत आहे.
सप्टेंबर २०३३: मंगळाची लोकसंख्या आता ३५४ झालेली असेन.
आता जगभरातल्या अंतराळ क्षेत्रातील कंपन्या एव्हाना मंगळावर मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ पाठवण्यासाठी तयार झालेल्या असतील. जेफ बेजोस यांची अमेझॉन कंपनी ही आत्तापासूनच पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी अशी डिलिव्हरी सेवा देण्याच्या मॉडेल वर काम करत आहे. जेफ बेजोस यांनी ब्लू ओरिजिन ही कंपनी भले ही एलोन मस्क यांना व्यावसायिक स्पर्धा निर्माण करण्यासाठी निर्माण केली आहे. पण पुढे अमेझॉन च्या सर्व डिलिव्हरी याच कंपनी मार्फत केल्या जातील यात काही शंका नाही. आता माशांना देखील या यात्रेत मंगळावर वाढवून प्रयोग केले जातील.
नोव्हेंबर २०३५: मंगळाची लोकसंख्या ७४८ झालेली असेन .
हे वर्ष विशेष असणार आहे. कारण या काळात मंगळ हा ग्रह पृथ्वीच्या खूप जवळ आलेला असेन. त्यामुळे नेहमी लागो त्या ७ किंवा ८ महिन्यांऐवजी मंगळावरून येणारे यान पृथ्वीवर केवळ ५ महिन्यातच पोहोचेल. आतापर्यंत मानवासाठी राहण्यायोग्य अशा वसाहतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले असेल. आणि मंगळावरचे पहिले हॉस्पिटल सुद्धा बांधायचे काम सुरु झालेले असेल.
सप्टेंबर २०४० : या वर्षी मंगळाची लोकसंख्या झालेली असेन ३,३३१
स्पेस एक्स ची सहकारी कंपनी बोअरिंग जमिनीखाली मेट्रो चे जाळे निर्माण करण्याच्या कामात व्यस्त असेन . आणि मंगळावर वस्ती करण्यासाठी जगातील जवळपास सर्वच देशांना यावेळी संधी दिली जाईन. आणि मंगळावर जन्म घेणारे पहिले बालक देखील याच सुमारास आपल्याला बघायला मिळेल.
जून २०४२: मंगळावरची लोकसंख्या आता ७,०४० एवढी झालेली असेन.
मंगळावर लोकसंख्या वाढल्यामुळे आणि ती वाढतच जाणार असल्यामुळे राजकीय धोरणे निश्चित केली जातील. कायदे निर्माण केले जातील. आणि मंगळावरील नागरिक त्यांच्या समस्यांचे समाधान तिथेच शोधू शकतील. पृथ्वीवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे पहिले पाऊल असेन. याच वेळी मंगळावर चे सर्वात पहिले रेस्टोरंट सुरु झालेले बघायला मिळेल. इथे बायो तंत्रज्ञानाने उगवल्या गेलेल्या भाज्यांचे खाद्यपदार्थ या रेस्टोरंट मध्ये मिळतील.
ऑगस्ट २०४४:
स्टारशिप रॉकेट द्वारे मंगळावर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे पृथ्वीवरून पाठवली जातील.. नवीन जन्मलेल्या अर्भकांची काळजी घेतली जाईल. मार्स चे स्वतःचे एक मोठे पॉवर स्टेशन बांधण्याचे काम सुरु झालेले असेल , जेणेकरून सारखे सारखे पृथ्वीवरून सोलर पॅनल मागवण्याची गरज संपेल.
ऑक्टोबर २०४६:
या वर्षात मंगळ ग्रहावरचे उंच शिखर माउंट ऑलम्पस जे माउंट एव्हरेस्ट पेक्षा अडीच पटीने मोठे आहे. यावर चढाई करण्यासाठी मंगळवासी प्रयत्न करतील. अर्थात मंगळावर गुरुत्वाकर्षण कमी असल्याचा फायदा गिर्यारोहकांना मिळेल आणि ही चढाई यशस्वी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. आतापर्यंत मंगळावर शिकण्यासाठी युनिव्हर्सिटी तयार होऊन तिचे काम सुरु देखील झालेले असेन . शिवाय सोलर पॅनेल्स तयार करण्याची फॅक्टरी निर्माण झालेली असेन . बॅटरी रिसायकल करून मंगळावर चावलता येतील अशा गाड्याची निर्मिती केली जाईल जेणेकरून एका ठिकाणाहून दुसर्या दूरच्या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल.
फेब्रुवारी २०५१: मंगळावरची लोकसंख्या आता १,४०,००० पेक्षाही जास्त झालेली असेन .
या वर्षी देखील मंगळ पृथ्वीच्या अगदी जवळ आला असल्यामुळे खूप लोक मंगळावर येतील . पृथ्वीच्या जवळ आल्यावर आता २०,००० पेक्षाही जास्त प्रवासी प्रत्येक वेळी मंगळावर जायला सुरुवात झाली असेल. बोअरिंग कंपनीने मंगळाच्या जमिनीच्या आत मानवाला राहण्यास योग्य आणि एकमेकांना जोडलेली अनेक मार्गांची जाळी निर्माण केलेली असतील.
आता यापुढील प्रगती वेगवान होईल. मंगळाच्या ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळवून झरे नद्या निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु झालेली असेल. मंगळावरील मुलांना पृथ्वीवर आणले जाईल. किंबहुना त्यावेळचे अनेक फोटो बघून कोणता फोटो पृथ्वीवरचा आणि कोणता मंगळावरचा हेही ठरवणे कदाचित अवघड होईल
तर मानवाच्या मंगळ ग्रहावरील या स्थलांतराला शुभेच्छा आणि आपण सर्व लवकरच या सर्व अद्भुत इतिहासाचे साक्षीदार होणार आहोत. त्यासाठी आपल्या मनाची तयारी करण्यासाठी या लेखाचा उपयोग झाला तरी पुरेसे आहे.
पृथ्वी आणि मंगळ यांच्यात बरेच फरक असले तरीही अनेक साम्यस्थळे आहेत ज्याचा मानवाला मंगळावर राहण्यासाठी उपयोग व्हावा. पुढील तक्त्यावरून या २ ग्रहांत असलेला हा फरक लक्षात यावा.
https://mars.nasa.gov/images/mep/allaboutmars/quickfacts/Mars_QuickFacts_sample7_recolored.png
धन्यवाद,
सागर ...
Mars Facts: