Monday, August 22, 2016

सूर्यमालेबाहेरील ग्रहावर ऑक्‍सिजनचे अस्तित्व





सूर्यमालेबाहेरील आकाशगंगेत शुक्राशी साम्य असणाऱ्या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे या ग्रहावर प्राणवायूचा (ऑक्‍सिजन) पातळ थर असल्याचे आढळले आहे. पृथ्वीपासून हा ग्रह 39 प्रकाशवर्षे दूर आहे. प्राणवायूचे वातावरण असलेला हा आपल्या सूर्यमालेबाहेरील पहिलाच ग्रह आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. 

वैचित्र्यपूर्ण वातावरण 
या ग्रहावराचा शोध गेल्या वर्षी लागला. तेथील वैचित्र्यपूर्ण वातावरणामुळे संशोधकही आश्‍चर्यचकित झाले आहेत. तेथील तापमान 232 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. नवीन संशोधनानुसार येथील वातावरण अस्पष्ट व विरळ असल्याचे निदर्शनास आले आहे. याचे नामकरण "जीजे 1132बी‘ असे करण्यात आले आहे. अमेरिकेतील हॉवर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक (सीएफए) या संस्थेतील खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर या व त्यांचे सहकारी याविषयी संशोधन करीत आहे. "जीजे 1132बी‘वर वाफेसारखे व जलयुक्त वातावरण असले तर काय घडू शकते याचा अभ्यास शेफर करीत आहेत. 

ऑक्‍सिजन आहे, पाणी नाही 
"जीजे 1132बी‘ हा ग्रह त्यांच्या सूर्यमालेतील ताऱ्याच्या अत्यंत जवळ आहे. हे अंतर 14 लाख मैल इतके आहे. या ग्रहावर अतिनील अथवा "यूव्ही‘ किरण मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून आले आहे. हे किरण पाण्यातील रेणूंचे हायड्रोजन व ऑक्‍सिजनमध्ये विभाजन करतात. हायड्रोजन हा ऑक्‍सिजनपेक्षा हलका असल्याने तो अंतराळात नाहीसा होतो. त्यामुळे "जीजे 1132बी‘वर प्राणवायूचे विरळ वातावरण असल्याचा निदर्शनास आले आहे. मात्र जीवसृष्टीसाठी अनिवार्य असलेल्या पाण्याचे अस्तित्व येथे आढळलेले नाही. दोन्ही वायू अवकाशात नाहीसे होतात. ""थंड ग्रहावर असलेला ऑक्‍सिजन हा निवासास योग्य समजला जातो. पण "जीजे 1132बी‘सारख्या गरम वातावरणाच्या ग्रहावर अगदी याच्या विरुद्ध स्थिती आहे, असे मत शेफर यांनी नोंदविले आहे. या ग्रहावर हरित वायूचा मोठा प्रभाव आहे. यावर आधीच गरम वातावरण असल्याने येथील पृष्ठभाग लाखो वर्षांपासून वितळत आहे, असेही त्या म्हणाल्या. 

अधिक अभ्यास शक्‍य 
या ग्रहावर आम्हाला प्रथमच ऑक्‍सिजनचे अस्तित्व आढळले, असे "हॉवर्ड पॉलसम स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाईड सायन्सेस‘चे रॉबिन वर्डस्वर्थ यांनी सांगितले. "जीजे 1132बी‘वर ऑक्‍सिजन असला तर अत्याधुनिक व शक्तिशाली "जायंट मॅग्लन‘ व जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीतून याचा शोध घेऊन त्याचे विश्‍लेषण करता येईल, असे मत संशोधकांनी नोंदविले आहे. 

"मॅग्मा ओशन‘ची उपयुक्तता 
खगोलशास्त्रज्ञ लॉरा शेफर यांनी एक "मॅग्मा ओशन‘ नावाची प्रतिकृती तयार केली आहे. यातून आकाशगंगेत शुक्रासारख्या असणाऱ्या ग्रहांचा शोध घेणे शक्‍य होणार आहे. ग्रहांवर ऑक्‍सिजन का नसतो हा शास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून सतावणारा प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे. "मॅग्मा ओशन‘द्वारे सूर्यमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेता येणार आहे. "ट्रॅपिस्ट-1‘ या सूर्यमालेत तीन ग्रह असून त्यावर अधिवास करण्यायोग्य वातावरण असल्याचे आढळले आहे. हे ग्रह "जीजे 1132बी‘ पेक्षा थंड असल्याने त्यावर निवास योग्य वातावरण असण्याची दाट शक्‍यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. 


माहिती सौजन्य : सकाळ

ऑक्टोबर २०२१ महिन्याचे आकाश दर्शन : शुक्र व ज्येष्ठेची दुर्मिळ युती ...

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे खगोल दर्शन  सौजन्य : दैनिक सकाळ (०१ ऑक्टोबर २०२१) मार्गदर्शक : डॉ. प्रकाश तुपे सर.